
नवी दिल्ली : रेखा गुप्तांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली : भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी आज, गुरुवारी दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल विजय सक्सेना यांनी रामलीला मैदानावर आयोजित सोहळ्यात गुप्तांना पद व गोपनियतेची शपथ दिली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
यावेळी भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्यासह 6 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या यादीत पंकज सिंग, आशिष सूद, रवींद्र इंद्रराज, कपिल मिश्रा आणि मनजिंदर सिंग सिरसा यांची नावे समाविष्ट आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे केंद्रीय मंत्री लल्लन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यादरम्यान एनडीए नेत्यांची गर्दी दिसून आली.रेखा गुप्ता दिल्लीच्या शालीमार बाग मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. रेखा गुप्ता या व्यवसायाने वकील आहेत. याशिवाय, त्यांची गणना भाजपमधील आघाडीच्या नेत्यांमध्ये केली जाते. त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद येथे झाला पण त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले आहे.
यासोबतच नवी दिल्लीतून आमदार निवडून आलेले आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले प्रवेश वर्मा यांचाही दिल्लीच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असेल. अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते परंतु, नंतर बदललेल्या समीकरणानुसार त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. यासोबतच कपिल मिश्रा यांचाही दिल्लीच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. करवल नगरचे आमदार कपिल मिश्राही आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. करवल नगरमधून ते दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. भाजपपूर्वी ते आम आदमी पक्षातही होते. तिसचे नाव आमदार आशिष सूद यांचे असून ते दिल्लीच्या जनकपुरीमधून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. यापूर्वी आशिष हे नगरसेवक होते. ते भाजपचे गोवा आणि जम्मू काश्मीरचे प्रभारीही आहेत. मनजिंदर सिंग सिरसा यांचाही दिल्लीच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते राजौरी गार्डनचे आमदार आहेत. तिसऱ्यांदा आमदार झालेले सिरसा यांनी 2021 मध्ये शिरोमणी अकाली दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये विकासपुरीतून विजयी झालेले आमदार पंकज सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. तर सहावे नाव रवींद्र इंद्रराज यांचे असून ते बवाना मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झाले आहेत.