
मुंबई (MUMBAI) : सातत्याने वादाचा विषय ठरलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजकीय जबाबदारीतून पदमुक्त होण्याची इच्छा प्रदर्शित केली (Governor Bhagat Singh Koshyari) आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा आपण पंतप्रधानांकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी दिली. या संदर्भात राजभवनाकडून प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती देण्यात आलीय.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विनंतीवर केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागलेले आहे. कोश्यारी यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त व वादळी ठरली आहे.
या प्रसिद्धीपत्रात राज्यपाल कोश्यारी म्हणतात की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांची आतापर्यंची कारकीर्द वादग्रस्त ठरलेली आहे. राज्यपाल पदावर साधारणतः टिकाटिप्पणी केली जात नाही. मात्र, राज्यपाल कोश्यारी हे त्याला अपवाद ठरले आहेत. राज्यपालांचे निर्णय व त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विधान परिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीला मंजुरी न देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला होता. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते, असे वादग्रस्त विधान करून कोश्यारी यांनी रोष ओढवून घेतला होता.