अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमक्या, सुरक्षेत वाढ

0

नागपूर : दिव्य दरबार भरविण्याच्या दाव्यावरून बागेश्वरधामचे धिरेंद्र शास्त्री यांना आव्हान देणारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना (Security of Shyam Manav tightened) जिवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. श्याम मानव यांना “तुमचा दाभोळकर करू” अशी धमकी देण्यात आली आहे. ही धमकी नेमकी कोणाकडून देण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती समितीचे नेते हरीश देशमुख यांनी दिली आहे. यासंदर्भात पोलिस तक्रारही करण्यात आली आहे. सुरुवातीला श्याम मानव यांना दोन सशस्त्र जवानांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. आता त्यात आणखी दोन सशस्त्र गनमेन आणि तीन पोलिस कर्मचारी तैनात राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. “आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु”, अशी धमकी मानव यांना देण्यात आली. यापूर्वीही मानव यांच्या एका कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. श्याम मानव हे हिंदू धर्माच्याच विरोधात बोलतात व हिंदु धर्माला बदनाम करतात, असा आक्षेप हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात येत आहे.

श्याम मानव यांनी बागेश्वरधामचे धिरेंद्र शास्त्री महाराज यांना दिव्यशक्ती सिद्ध करून दाखविल्यास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले आहे. त्यानंतर दोन्ही बाजुंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत. मानव यांचे आव्हान स्वीकारल्याचा दावा बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. मात्र, हे आव्हान नागपुरातच स्वीकारले जावे, असे श्याम मानव यांचे म्हणणे आहे.