नवी दिल्ली : रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिलाय. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत एनडीएमध्ये राहू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपमध्ये नवे मित्रपक्ष येत असताना दुसरीकडे जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष होत असल्याची सल जानकर यांनी बोलून दाखविली. जानकर यांनी आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेची सुरुवात केली.
जानकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने जर आमचा विचार केला नाही तर लोकसभेच्या देशात 453 जागा लढवणार आहोत. एक दिवस आपण पंतप्रधान होणार व विठ्ठलाच्या दर्शनाला येणार, असा दावाही त्यांनी केला. बारामती लोकसभा हा आपला आत्मा असून बारामतीची जागा यासाठीच मागितली असून तिथूनही लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.