-नागपूर, वर्धा आणि अमरावती
येथे विनामूल्य प्रशिक्षण
नागपूर : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळण्यासोबतच प्रक्रिया उद्योग स्थापन करून विपणन व्यवस्था निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था,सारथी मार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून नागपूर, वर्धा आणि अमरावती येथे विनामूल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
राज्यात शेतकऱ्यांद्वारे स्थापित कंपन्यांना शास्त्रोक्त पद्धतीने सक्षम व शाश्वत कंपनी चालविण्याकरिता मार्गदर्शनासाठी सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यात येते. शेतकरी कंपनीच्या लक्षित गटातील संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रातिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहकार विकास महामंडळामार्फत दोन वर्ष नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील जास्तीत-जास्त शेतकरी सभासदांनी या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.