नवी दिल्लीः ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या हाती काही नवी माहिती आली आहे. मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी एका होळी पार्टीला हजेरी लावली होती. ज्या फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी आयोजित करण्यात आली होती, तेथे पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधं आढळून आली आहेत. आक्षेपार्ह औषधांची पाकिटे नेमकी कोणासाठी आणली गेली व त्याचा कोणी वापर केला?, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात (Satish kaushik Death Case Investgation) आहे. या फार्म हाऊसचे मालक विकास मालू हे कौशिक यांचे मित्र होते. होळीच्या पार्टीत नेमकी कोणाकोणाची उपस्थिती होती, याची माहितीही पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी फार्म हाऊसमध्ये १० ते १२ पाहुणे आले होते. त्यांची यादी पोलिसांकडून तयार केली जात आहे. कौशिक यांच्या पोस्ट मॉर्टम अहवालात कुठलीही संशयास्पद माहिती पुढे आलेली नाही. त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. मात्र, मृत्यूच्या वेळी कौशिक यांच्या शरीरात कुठले कुठले घटक होते, याची माहिती पोस्ट मॉर्टमच्या सविस्तर अहवालातून येईल, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी व्हिसेराचे नमूने घेण्यात आले आहेत.
सतीश कौशिक हे दिल्लीतील बिजवासन येथील फार्महाऊसवर होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना तातडीने गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.