
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) बंडखोरी करणारे काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांच्यावरही आता निलंबनाची (Congress likely to suspend Satyajeet Tambe) कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे ( Congress Leader Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता सत्यजीत यांनाही निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस पक्षाच्या शिस्तपालन समितीने केली असून आता केवळ काँग्रेस हायकमांडच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाचा आदेश डावलून सत्यजीत तांबे यांनी नाशिकमध्ये अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी शिफास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडे केली आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या अडचणी वाढणार आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांना भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. तांबे यांच्याकडून अधिकृतरित्या पाठिंब्याची मागणी झाल्यावरच भाजप त्यांना पाठिंबा देणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचा पाठिंबा असलेल्या नाशिकमधील उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. उमेदवारी माघारीच्या दिवशी शुभांगी पाटील मात्र नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. एकीकडे माघारीसाठी अवघा एक तास शिल्लक असताना नाशिक पदवीधर मतदारसंघात चांगलाच पेच उभा राहिला आहे.