नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास (Nagpur Division Teachers Constituency) आघाडीत मतैक्य झाल्याचे संकेत मिळत असून काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना आघाडीचे समर्थन मिळाले असल्याची माहिती आहे. अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले असल्याने आता शिवसेना समर्थित उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी माघार घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांनीही माघार घेतलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात एकूण २७ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरुवातीला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. मात्र, त्यामुळे नागपुरात काँग्रसमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनीही अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली व आता तेथे काँग्रेसच्या एवजी शिवसेना ठाकरे गट समर्थित शुभांगी पाटील या उमेदवार आहेत. त्यामुळे आता नागपूरची जागा पुन्हा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय झाला असून काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले हे उमेदवार राहतील, असे संकेत आहेत. अखेरच्या दिवशी शिवसेना ठाकरे गट प्रणित शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीष इटकेलवार तसेच शिक्षक भारतीचे राजेंद्र झाले हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.