हृदयाचा बंद असलेला व्हॉल्व उघडून २ दिवसांच्या बाळाचे प्राण वाचविले

0

•लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह, हिंगणा रोड, नागपूरच्या हृदयरोग तज्ञांची किमया.
•अत्यंत दुर्मिळ प्रकरण अत्याधुनिक उपचार पद्धतीने हाताळले.

नागपूरच्या मातृसेवा संघ येथे एका गोंडस मुलीने जन्म घेतला. जन्मत: नवजात बाळाच्या ऑक्सिजनचे प्रमाण ७०-८०% होते, ही गंभीर बाब होती. बाळाला लगेच ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. तरीसुद्धा ऑक्सिजनचे प्रमाण गरजेपेक्षा कमीच होते. २ दिवस उपचार करूनसुद्धा बाळाची परिस्थिती गंभीरच होती. उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथील डॉक्टरांशी संपर्क साधला. बाळाला ताबडतोब पाठवा, असे लता मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी सुचविले. बाळ पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी उपचाराची सर्व तयारी करून ठेवली होती. गंभीर अवस्थेत बाळ पोहोचताच ताबडतोब नवजात / बाल-आयसीयूमध्ये भरती करून व्हेंटीलेटर लावण्यात आले. अत्यावश्यक निदान चाचण्या करण्यात आल्या.
रुग्णालयाचे निष्णात हृदयरोग विशेषज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी त्यांच्यापरीने काही चाचण्या केल्या. त्यात त्यांना लक्षात आले की, जन्मत: बाळाच्या हृदयाचा एक व्हॉल्व बंद आहे. त्यामुळे रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन पुरवढा बरोबर होत नाही आहे. २ दिवसांच्या बाळाची ही अत्यंत दुर्मिळ केस आहे, ताबडतोब निर्णय घेऊन शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. परंतु, २ दिवसांच्या बाळाची शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे आहे, असे डॉ. भागवतकर यांचे मत होते. त्यांनी स्वतःच जोखीम पत्करून शस्त्रक्रिया न करता आपात्कालीन परिस्थितीमध्ये बाळाच्या पायामार्गे एक दुर्मिळ प्रोसिजर केली आणि बंद असलेला व्हॉल्व मोकळा केला. त्यानंतर हृदयाला होणारा रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु करण्यात यश मिळविले. आता बाळाचे ऑक्सिजनचे प्रमाण १००% आहे. बाळ तंदुरुस्त असून पालकांनी आनंद व्यक्त करून लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरच्या डॉक्टरांचे आणि चमूचे आभार मानले आहेत.
या उपचारात सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर (हृदयरोग विभाग प्रमुख, लता मंगेशकर हॉस्पीटल) यांच्या मार्गदर्शनात डॉ. मनीष चोखान्दरे (बाल-हृदयरोग तज्ञ), डॉ. रोशन (हृदयरोग बधिरीकरण तज्ञ) यांनी ही उत्कृष्ट कामगिरी बजावली. डॉ. गिरीश नानोटी (बालरोग विभाग प्रमुख) आणि चमूने नवजात / बाल-आयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवरील बाळावर काळजीपूर्वक उपचार केले. २ दिवसांच्या लहान बाळाचे हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण अत्यंत आधुनिक पद्धतीने उपचार करून हाताळण्यात लता मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी यश मिळविले. “विदर्भातील हे पहिलेच मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय आहे, ज्याने असे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळले आणि बाळाचे प्राण वाचविले. भविष्यातसुद्धा रुग्णालयाचे अत्याधुनिक हृदयरोग व कॅथलॅब विभाग गरजू रुग्णांसाठी वरदान ठरेल”, अशी प्रतिक्रिया एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी व्यांनी व्यक्त करून डॉक्टरच्या चमूचे अभिनंदन केले आहे