शिंदे सरकार’ खेडमधून देणार ‘उत्तर’

0

आजच्या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष : उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तराची तयारी

रत्नागिरी. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी ५ मार्चला विराट सभा घेऊन शिंदे सरकारवर बोचरे टीकास्त्र डागले अगदी त्याच रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील गोळीबार मैदानावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांची आज उत्तर सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम (Former minister Ramdas Kadam ) यांनी या सभेचं आयोजन केले आहे. यापूर्वीच कदम यांनी ठाकरेंनी घेतली त्यापेक्षा मोठी सभा घेणार असल्याचे ठासून सांगितले आहे. सभेच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आता ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे काय उत्तर देतात त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सभेवर फारसे भाष्य करणे टाळले असले तरी सर्व उत्तरे ५ मार्चच्या विराट सभेतूनच कोकणवासीयांनी दिले असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ५ मार्चला झालेल्या सभेतून शिंदे गटाला लक्ष केले होते. ज्यांना जे शक्य होते ते दिले, पण ते आता खोक्यात बंद झाले आहेत अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलो आहे. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय? असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. मी अडीच वर्षे घरात राहिल्याचा आरोप ते करतात, पण त्याकाळात करोना असल्याने सारेच घरात होते. पण घरातूनच अवघा महाराष्ट्र सांभाळला. तुम्ही मात्र घरोघरी, अगदी गुवाहाटीला फिरुन सांभाळू शकत नाही. दिल्लीत मुजरे मारायला जाण्यात तुमचे अर्ध आयुष्य जात आहे. ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जाते आहे. सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होते. कारण गुजरातला निवडणुका होत्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहीत ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचा विजय असो हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली असल्याचे ठाकरे म्हणाले होते. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.