न्याय व्यवस्थेला धमक्या देणारं हे सरकार

0

खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल, केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर निशाणा

मुंबई. देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, कार्यकर्ते झालेले हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरोधात उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असे गंभीर वक्तव्य कायदामंत्री किरेन रिजिजू (Law Minister Kiren Rijiju ) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केला होता. त्यावर आता सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनाही या विषयावर खरमरीत प्रतिक्रीया दिली आहे. केंद्रातील सरकार न्याय व्यवस्थेलाच धमक्या देणारे असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्ष वाढल्याचे चित्र दिसत आहे. देशात पुन्हा एकदा न्यायपालिका विरुद्ध कायदेमंडळ असा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही भूमिका मांडली आहे. त्यानंतर आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी किरेन रिजिजू यांच्या विधानांवर हल्लाबोल केला. सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर मी काही बोलणार नाही. पण देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू हे वारंवार न्यायालयावर दबाव आणत आहेत. त्यांचे कालचे वक्तव्यही तसेच आहे. काही माजी न्यायमूर्ती सरकारविरोधात मत व्यक्त करतात, असे ते म्हणाले. याचा अर्थ काय? ही धमकी आहे का? सरकारविरोधात बोलणं हा काही देशद्रोह नाही. असं वक्तव्य करणे हा न्याययंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार आहे, असे संजय राऊत म्हणाले. देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी, आमचे ऐकले नाहीत, तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू अशी ही धमकी आहे. आम्हाला हवे तसे निर्णय द्या, आम्ही नंतर तुम्हाला जी राज्यपाल पदे किंवा सरकारी पदे देऊ ती घ्या आणि गप्प बसा. जे हे घेणार नाहीत, स्वत:ची भूमिका मांडत राहतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी देशाचे कायदामंत्री देत असतील, तर तो या देशाचा, संविधानाच खूप मोठा अपमान आहे. ज्या पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते, त्या पदावर असे लोक बसवून न्याययंत्रणेला धमक्या देणारे हे सरकार आहे, या शब्दांत राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.