मुंबई : “बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा..”, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका पुस्तकात केल्याचा दावा काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी केला होता. आता त्यांच्या या विधानाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी (Satyaki Savarkar) समाचार घेतला आहे. “सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात हे विधान मला दाखवावे”, असे थेट आव्हान त्यांनी वडेट्टीवारांना दिले आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचे आहे. सावरकरांनी असे कुठलेही वाक्य ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिलेले नाही. त्यांनी ते विधान मला दाखवावे. असे कोणतेच वाक्य पुस्तकात नाही. सहा सोनेरी पाने पुस्तक मी वाचलेले आहे,” असे सात्यकी सावरकर यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.
या मुद्यावर सविस्तर बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले की, स्वा. सावरकरांना काँग्रेसकडून मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. एकतर त्यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेले देखील नाही. त्यांचे सल्लागार मंडळ सांगते त्याप्रमाणे ते बोलत असतात. स्वतः पडताळून पाहणाचे कष्टही ते घेत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले. काँग्रेसची सत्ता गेलेली आहे. त्यामुळे कोणाचे तरी लांगूलचालन करून सत्ता परत मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.