भारतातून साडेसहा हजार अतिश्रीमंत व्यक्तींचे स्थलांतरण होणार

0

नवी दिल्ली- जगभरातील संपत्ती व गुंतवणुकीच्या स्थलांतरणाचा सातत्याने आढवा घेणाऱ्या हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्टच्या ताज्या अहवालात मोठा दावा करण्यात आलाय. भारतातून सुमारे साडेसहा हजार अति श्रीमंत व्यक्ती देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा या अहवालातून करण्यात आलाय. सुमारे ८ कोटी २० लाख रुपये इतकी गुंतवणूक क्षमता असलेल्या व्यक्तीला उच्च नेट वर्थ व्यक्ती म्हणून मानले जाते. भारतानंतर अशा प्रकारच्या स्थलांतरणात चीन सर्वात आघाडीवर असून भारताचा दुसरा तर ब्रिटनचा तिसरा क्रमांक लागतो. या देशांमधून इतर देशांमध्ये स्थायिक होण्याचे प्रमाण वाढते आहे.
अहवालानुसार, देश सोडून जाणाऱ्या श्रीमंतांमध्ये चीन हा एकमेव देश आहे, जिथे भारतापेक्षा जास्त श्रीमंत लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. २०२३ मध्ये चीनमधील साडे तेरा हजार श्रीमंत लोक देश सोडून जाण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. या यादीत रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. रशियातून तीन हजार श्रीमंत लोक देश सोडू शकतात, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे अतिश्रीमंत लोकांचा हा वर्ग ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, अमेरिका आणि स्वित्झर्लंड या पाच देशांमध्ये स्थायिक होण्यास पसंती देत आहे. यापैकी दुबई आणि सिंगापूर ही श्रीमंत भारतीय कुटुंबांसाठी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेय. गेल्यावर्षी सुमारे साडेसात हजार भारतीयांनी इतर देशांमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतल्याचे अहवाल सांगतो.