पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी जी स्फोटके सापडली होती, ती फडणवीसांनीच ठेवली होती, असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole) यांनी केला होता. त्याला आज देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले.
सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनी केला, असे स्टेटमेंट आता द्यावे का, अशी माझी इच्छा झाली आहे”,या शब्दात त्यांनी पटोलेंवर पलटवार केलाय. ते पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
फडणवीस म्हणाले,
नाना पटोलेंना तर अवॉर्ड दिला पाहिजे. अंबानीच्या घरापुढे स्फोटके मीच ठेवली, असे ते सांगतात. आता मला इच्छा झाली आहे. आपणही एक स्टेटमेंट द्यावं की, सव्वीस अकरा चा दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला. सचिन वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतला? या वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१७ साली उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला. मंत्री आले माझ्याकडे, दबाव आणला की साहेबांनी आग्रह धरला आहे. काहीही झाले तरी वाझेला पोलीस दलात परत घ्या. पण मी स्पष्टपणे सांगितले की, वाझेला मी परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिले की मी परत घेणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
उद्धवजींचे सरकार आल्यानंतर वाझेला पोलीस दलात परत घेतले गेले. त्यानंतर हा वाझे कुठे असायचा? वर्षावर नाहीतर मातोश्रीवर. हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमबीर सिंगांनी तुमच्यावर आरोप केले यात आमची काय चूक? परबमीर सिंगांना आयुक्त कोणी केला? ठाकरेंनी. आरोप केल्यावर काढलं कोणी? उद्धव ठाकरेंनी. वाझेच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं. त्याच्या जबानीतून सगळं पुढे आलं, असेही फडणवीस म्हणाले.
यांचे रॅकेट मी बाहेर काढले नसते, मनसूख हिरेनची हत्या मी बाहेर काढली नसती, तर हे सगळं यांनी पचवून टाकले असते. विरोधी पक्षनेता म्हणून मनसूख हिरेनची हत्या शोधून काढली. त्यामुळे यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये कमावून राहिले असते, असेही फडणवीस म्हणाले.