मुंबईः आयएनएस ‘विक्रांत’ साठी निधी गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर लावण्यात आले (Clean Chit for Somayyas in INS Vikrant Case) होते. या आरोपांतून या पिता-पुत्रांना क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पितापुत्रांना क्लीन चिट देत दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याची कबुली पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर आरोप लावले होते. दरम्यान, सोमय्यांना क्लीनचिट दिल्यावर आता राऊत यांनी ‘२०२४ मध्ये हिशोब केला जाईल’ असा इशारा देत प्रकरण दडपण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना सोमय्या यांनी सरकारमधील अनेक प्रकरणे बाहेर काढली होती. त्यानंतर संजय राऊत यांनीही सोमय्या यांच्यावर आयएनएस ‘विक्रांत’ साठी निधी गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र, त्यात तथ्य आढळून आलेले नाही, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, एक रुपया असेल किंवा ५० कोटी असतील, पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनात गेले असे म्हणतात आणि राजभवन म्हणते की पैसे आलेच नाहीत. हाच भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा आहे, असा दावाही त्यांनी केला.