स्टाफ सिलेक्शन परीक्षाही मराठीतून देता येणार

0

१३ प्रादेशिक भाषांमधून परीक्षा घेण्याचा केंद्राचा निर्णय
दिल्ली. केंद्र सरकारने यापुढे स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि मल्टि टास्किंग (Non technical) पदांसाठी १३ प्रादेशिक भाषांमधून परीक्षा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मराठीसह उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषांतूनही उत्तरपत्रिका लिहिता येऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह (Minister of State Jitendra Singh ) यांनी दिली. केवळ एखादी भाषा येत नाही म्हणून कोणालाही नोकरी मिळण्यात अडथळे येऊ नयेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यानुसार इंग्रजी, हिंदीसह आता प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.

आणखी भाषांचाही होणार समावेश
एमपीएससी, यूपीएसी सारख्या परीक्षा मराठीतून देण्याची मुभा आहे. मात्र स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये ती मुभा नव्हती. त्यामुळे गैर हिंदी आणि इंग्रजी विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. कनिष्ठ पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हिंदी, इंग्रजी या भाषा व मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातील. पुढच्या टप्प्यात भाषांची व्याप्ती अधिकच वाढविली जाणार आहे. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व २२ भाषांमध्ये आगामी काळात ही परीक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस या मुद्द्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितीने केली होती. त्या शिफारसीचा केंद्र सरकारने स्वीकार केला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
दक्षिणात्या राज्यांची होती मागणी
स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी मुख्यत्वे दक्षिण भारतातील राज्यांकडून करण्यात येत होती. त्याचा विचार करून केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक भाषांतून या परीक्षा घेता येतील का, यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समितीही नेमण्यात आली होती. समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणर असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.