नागपूर : विदर्भातील 4 जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना एका पत्राद्वारे केली आहे. ( Start Nagpur Hyderabad Vande Bharat Express, says Sudhir Mungantiwar to Railway Minister )
नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांताना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. हैद्राबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे. नागपूर ते हैद्राबाद जोडणार्या सध्या 22 रेल्वे गाड्या असल्या तरी 575 किमीचे हे अंतर पार करणारी वेगवान गाडी असणे आवश्यक आहे. नागपूर सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा होईल, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीसाठी नागपूर हैद्राबाद जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस तातडीने सुरू करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रातून केली आहे.