नागपूर : आकांक्षा प्रकाशनच्या वतीने राज्यस्तरीय कथा स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. आकांक्षा प्रकाशन गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. कधी वाचक /लेखक मेळावा असेल, साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, कवी संमेलन,लिहीत्यांची कार्यशाळा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. साहित्याचा वसा आणि वारसा सतत पुढील पिढी पिढीमध्ये संक्रमित होत राहावा, मराठी साहित्यातील रूची टिकून राहावी, ते रुजावे, त्यांना अभिव्यक्तीसाठी मंच उपलब्ध व्हावा आणि साहित्य संस्कृती जतन व्हावी हा यामागे उद्देश आहे. अलिकडे कथा लोप पावत चालली आहे की काय? अशा प्रकारचे प्रश्न वारंवार समोर येत आहेत. जे लिहितात त्यांना वाव मिळावा, जे लिहीत नाहीत त्यांना यानिमित्ताने प्रोत्साहन मिळावे या हेतूने कथालेखन स्पर्धा आकांक्षा प्रकाशनाने आयोजित केली आहे. 20 वर्ष वयाच्या पुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. कथा अप्रकाशित , मराठीत आणि स्वलिखित असावी.विषयाचे बंधन नाही. मात्र ती अडीच ते तीन हजार शब्द मर्यादेत असावी. वऱ्हाडी, ग्रामीण, बोलीभाषा, प्रमाणभाषा अशी कोणत्याही मराठी भाषेत लिहिलेली चालेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. कथा ए ५०६, गणेश गौरी, कोतवाल नगर, नागपूर या पत्त्यावर 10 एप्रिल 2023 पर्यंत पाठवावी, असे आकांक्षा प्रकाशनाच्या संचालक अरुणा सबाने यांनी कळविले आहे.