
चंद्रपूर (Chandrapur), दि. 29 मे: आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला शासनामार्फत एकूण 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. मात्र, चालू वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने विभागासाठी 21,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या अनुषंगाने, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीमध्ये स्पष्टपणे वाढ करण्यात आली असून, त्यामुळे आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजनेस निधीअभावी खंडित करावे लागणार नाही, असेही मंत्री डॉ. उईके यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. केंद्र सरकारकडूनही आदिवासी विभागास 100 टक्के पाठिशी असून केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या विविध योजनासाठी देखील अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे.
“त्यामुळे निधी कमी केल्याचा किंवा योजना बंद केल्याचा कुठलाही अपप्रचार चुकीचा असून, तो तत्काळ थांबवावा,” असे आवाहन डॉ. उईके यांनी यावेळी केले.