आई थोडक्यात बचावली : पाटणबोरीत हळहळ
यवतमाळ. अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शॉक लागला. हा प्रकार लक्षात येताच मुलीला वाचविण्यासाठी आईने धाव घेतली. तिलासुद्धा विजेचा जबर धक्का बसला. वडिलांनी प्रसंगावधान राखत विद्युत प्रवाहच खंडित केल्याने आई बचावली. पण, मुलगी बेशुद्धा पडली. उपचार मिळावेत यासाठी शेजाऱ्यांनी बरीच धावाधाव केली. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला (Student dies because of shock). ही घटना केळापूर तालुक्यातील पाटणबोरी (Patanbori in Kelapur Taluk ) येथील वार्ड क्रमांक 4 अंतर्गत असलेल्या खडकपुरा परिसरात घडली. या घटनेचा कुटुंबियांना जबर धक्का बसला असून पाटणबोरीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सुमय्या युनूस पठाण (१७) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती अभ्यासात हुशार होती. दहावीतही चांगल्या गुणांनी पास झाली होती. सध्या तिचे अकरावीचे पेपर असल्याने अभ्यास सुरू होता. त्यातच काळाने अनपेक्षितपणे झडप घातली.
सुमय्या ही पांढरकवडा येथील मल्टी हायस्कूलची विद्यार्थिनी होती. परीक्षा तोंडावर असल्याने रात्री घरीच अभ्यास करीत होती. काहीसे कंटाळवाणे वाटू लागल्याने आईला सांगून घराच्या बाहेर आली. चेहऱ्यावर पाणी घेतले. तोंड पुसलेला टॉवेल तारेवर टाकायला गेली. त्याच तारातून वीज प्रवाह सुरू होता. टॉवेल आणि हात ओले असल्याने ती वायरलाचा चिपकून राहिली. शॉक लागताच सुमय्या जोरात ओरडली. आवाज ऐकून तिची आई बाहेर धावत आली. सुमय्या तारेला पकडून पडून असल्याचे दिसले. न राहवून तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे आईलासुद्धा शॉक लागला. वडिलांनी मेन स्वीच बंद करून दोघींनाही सोडविली. आवाजामुळे शेजारची मंडळी मदतीसाठी धावून आली. सुमय्या बेशुद्धावस्थेत होती. शेजाऱ्यांनीच धावपळ करीत तिला स्थानिक खासगी दवाखान्यात नेले. मात्र, तिथे उपचार मिळाले नाहीत. यामुळे शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांनी तिला आदिलाबादला हलविण्याचा निर्णय घेतला. वाटेतच तिचे निधन झाले. पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. अंत्ययात्रेप्रसंगी गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.