स्वामी विवेकानंदांची विज्ञान आस्था

0

स्वामी विवेकानंदांची विज्ञान आस्था

संपूर्ण जगावर आपली अमीट छाप सोडणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या अप्रतिहत प्रज्ञेला विज्ञान हा विषयसुद्धा वर्ज्य नव्हता. लौकिक अर्थाने महाविद्यालयात त्यांनी कला शाखेचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असला तरीही; देवदत्त बुद्धिमत्ता, अफाट व्यासंग, योगसाधना आणि आध्यात्मिकता यांच्या बळावर विकसित झालेले त्यांचे बुद्धीवैभव अचाट होते. अन त्या बुद्धीने आधुनिक विज्ञानालाही गवसणी घातली होती. एवढेच नव्हे तर विज्ञानाचे महत्त्वही त्यांनी पुरेपूर जाणले होते आणि त्या अनुषंगाने अभ्यास, वाचन, प्रयोग इत्यादी करण्यासाठी ते आपल्या गुरुबंधूंना प्रोत्साहित करीत आणि आग्रहदेखील धरत असत.

आपल्या पहिल्या अमेरिका भेटीनंतर भारतात परतल्यावर २० जून १८९७ रोजी अल्मोडा येथून आपले गुरुबंधू स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी; पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राच्या उपकरणांचा संग्रह, तसेच सूक्ष्मदर्शक यंत्र विकत घ्यावेत. बंगाली भाषेतील (त्यावेळी सगळे गुरुबंधू आणि अन्य भक्त बंगाली असल्याने) विज्ञान विषयावरील सगळी पुस्तके विकत घ्यावी व दर आठवड्यात पदार्थविज्ञान शास्त्र व रसायनशास्त्र यावर व्याख्याने आयोजित करावी; अशा सूचना केल्या होत्या. यानंतर ११ जुलै १८९७ रोजी आपले एक शिष्य स्वामी शुद्धानंद यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेल्या पत्राचा पाठपुरावा केला होता. भगिनी निवेदिता भारतात आल्यानंतर विज्ञान विषयावरील, विशेषतः जीवशास्त्रावरील त्यांची व्याख्यानेही मठात आयोजित केली जात असत.

विदेशातून भारतात पाठवलेल्या पत्रांमधून, त्या लोकांनी विज्ञानाचा उपयोग करून मानवी जीवन कसे सुखकर व उन्नत करून घेतले याचे उल्लेख स्वामीजी करीत असत. भारतातील एका व्यक्तीने इलेक्ट्रिकल विषयात अध्ययन करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी त्यांनी अमेरिकेतील श्रीमती ओली बुल यांना पत्र लिहून त्या भारतीय व्यक्तीला शक्य ती मदत करण्याची विनंती त्यांना केली होती. आज ही विनंती फारशी महत्त्वाची वाटणार नाही. परंतु आजपासून सव्वाशे वर्षांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेतली तर त्याचे अनन्यसाधारण महत्त्व ध्यानात येईल.

विज्ञानासंदर्भातील त्यांची आस्था व चिंतन अमेरिकेत गेल्यानंतर आणि पाश्चात्य सभ्यतेचा परिचय झाल्यानंतर सुरू झाले होते असे मात्र नाही. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या तिरोधानानंतर अगदी एकाकी अवस्थेत परिव्राजक म्हणून हिंडत असतानाही विज्ञान हा त्यांच्या विचारविश्वाचा भाग होता. या भटकंतीत परिचय झालेल्या श्री. प्रमदादास मित्र या तत्वज्ञ संस्कृत पंडितांना १३ डिसेंबर १८८९ रोजी लिहिलेल्या पत्रात, त्यांनी theory of conservation of energy चा पाश्चात्य तत्वज्ञानावर झालेला परिणाम; याच अनुषंगाने जर्मन दार्शनिक स्पेन्सर, हेगेल यांचे विचार यांची चर्चा केली आहे.

खेतरीचे पंडित शंकरलाल यांना शिकागो सर्वधर्मपरिषदेपूर्वी वर्षभर आधी, २० सप्टेंबर १८९२ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी; आपल्या देशात विज्ञानाचा अभाव का आहे याची मूलभूत चर्चा केली आहे. आपल्या देशात सामान्य सत्याकडून विशेष सत्याकडे जाण्याचा प्रयत्न होतो, विशेष सत्याकडून सामान्य सत्याकडे जाण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे निरीक्षण व सामान्यीकरण यांचा व त्यातून विकसित होणाऱ्या विज्ञानाचा अभाव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

परिव्राजक अवस्थेत हिंडत असताना खेत्रीचे राजे अजितसिंग यांच्याकडे झालेल्या अडीच महिन्यांच्या मुक्कामात सुद्धा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यातील सिद्धांताची चर्चा ते करीत असत. स्वामीजींच्या सूचनेवरून अजितसिंग यांनी राजवाड्यात एक प्रयोगशाळा सुरू केली होती आणि गच्चीवर एक दुर्बीण बसवली होती. या दुर्बिणीतून दोघेही आकाश निरीक्षण करीत असत.

इ. स. २००४ साली आलेल्या सुनामीच्या वेळी सगळ्यांनाच ती एक अपूर्व बाब वाटली होती. परंतु शिकागो सर्वधर्म परिषदेत, १९ सप्टेंबर १८९३ रोजी ‘हिंदुधर्म’ या विषयावर वाचलेल्या निबंधात, वेदप्रणित धर्माच्या वाटचालीबाबत भाष्य करताना स्वामीजींनी समुद्रातील सुनामीचा जो उल्लेख केला आहे तो स्तिमित करणारा आहे. समुद्रात आलेल्या भूकंपानंतर काही काळ समुद्र जसा मागे हटतो आणि नंतर सर्वग्रासी रूप घेऊन विस्तारत जातो, तसेच वेद प्रणित धर्माचे स्वरूप आहे, अशी मांडणी स्वामीजींनी केली होती. त्यांचा विज्ञान विषयाचा व्यासंगच यातून स्पष्ट होतो. त्यांच्या अनेक भाषणात, चर्चांमध्ये, पत्रांमध्ये; theory of conservation of energy आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांची चर्चा आहे.

विश्वरचना, विश्वनिर्मिती, जड व चेतन विश्व, मन, मानसशास्त्र, भौतिकवाद, विज्ञानाची बलस्थाने व विज्ञानाच्या मर्यादा, इंद्रियनिष्ठ ज्ञानाच्या मर्यादा, विज्ञान व चेतन विश्व, विज्ञानाची प्रगती व संशोधने; या साऱ्याची चर्चा तर त्यांनी अनेकदा केली आहेच; परंतु जीवनाच्या, तत्वज्ञानाच्या, धर्माच्या संदर्भात विज्ञानाचा आशय काय आहे, याचीही चर्चा केलेली आहे.

निरनिराळ्या ठिकाणच्या व्याख्यानांमध्ये स्वामीजींनी विज्ञानाच्या प्रकाशात पुनर्जन्म सिद्धांताचीही चर्चा केली होती. त्यांच्या प्रतिपादनाने तो विषय अधिक समजून घेण्याची उत्सुकताही अनेकांमध्ये निर्माण झाली होती. त्याचाच परिणाम म्हणजे, न्यूयॉर्कच्या Metaphisical Magazine ने त्यांना त्या विषयावर लेख मागितला आणि तो मासिकाच्या १८९५ च्या मार्च महिन्याच्या अंकात प्रसिद्धही झाला होता. जड द्रव्य व शक्तीच्या नित्यत्वाचा जो सिद्धांत विज्ञान मांडत आहे तोच पुनर्जन्माच्या सिद्धांताचा आधार असल्याचे प्रतिपादन स्वामीजींनी त्या लेखात केले होते.

विज्ञानाच्या याच सिद्धांताच्या आधारावर स्वामीजी प्रतिपादन करतात की, ही सृष्टी शून्यातून उत्पन्न होऊ शकत नाही. ‘काही नाही’मधून काहीतरी उत्पन्न होऊ शकत नाही. काहीच नव्हते अशी अवस्था कधीच नव्हती व कधीच नसेल, कारण या विश्वशक्तीतून कणभर सुद्धा काढून घेता येत नाही आणि त्यात कणभर वाढही करता येत नाही. मग होते काय? तर याच समग्र विश्वशक्तीचा क्रमविकास व क्रमसंकोच होत राहतो. एकामागे एक क्रमविकास व क्रामसंकोच या प्रक्रिया होत राहतात. ज्यावेळी काहीच नाही असे आपल्याला वाटते त्यावेळी ही संपूर्ण विश्वशक्ती क्रमसंकुचित झालेली असते आणि सगळे काही त्या शक्तीच्या मूळ रूपात विलीन झालेले असते. पुन्हा एकदा त्यातूनच या सगळ्याचा विकास होतो. हे विश्व ही निर्मिती नसून विकास आहे, असे अतिशय मूलभूत चिंतन स्वामीजी विज्ञानाच्या आधारे मांडतात. प्राचीन भारतीय/ हिंदू चिंतनासाठी यात नवीन काहीच नाही, असे प्रतिपादनही स्वामीजी करतात.

उच्च प्रतीच्या सत्याचे शोध ज्या श्रेष्ठ वैज्ञानिकांनी लावले ते त्यांच्या मेंदूत विद्युत शक्तीप्रमाणे एकाएकी स्फुरण पावले होते. अनेक प्रकारची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण या वैज्ञानिकांनी केले परंतु त्यातील सत्याचे निष्कर्ष त्यांना स्फुरले होते. हे निष्कर्ष म्हणजे तर्क नव्हेत. तर्काच्या प्रांतापल्याडहून ते त्यांना प्रतीत झाले, या मूलभूत वास्तवाची जाणीवही स्वामीजींना करून दिली आहे. उष्णता, विद्युत, चुंबकीय अशा विविध शक्ती एकाच मूळ शक्तीत परिवर्तित करता येतात हे आधुनिक विज्ञानाने नव्याने शोधून काढलेले तत्व भारतीय मनिषींनी फार पूर्वीच शोधले होते आणि त्या आधारेच त्यांनी विश्वाबाबतचे आपले सिद्धांत प्रतिपादित केले असेही त्यांचे मत होते.

डार्विनचा उत्क्रांतीवाद आणि महर्षी पतंजली यांनी प्रतिपादित केलेला उत्क्रांतीवाद यातील फरक सांगताना ते म्हणतात, ‘डार्विन स्पर्धा हे उत्क्रांतीचे कारण मानतात तर, पतंजली प्रकृतीची पूर्तता हे उत्क्रांतीचे कारण मानतात.’ दृष्टिकोनातील या भिन्नतेमुळे संपूर्ण विश्व व्यापाराकडे पाहण्याची आणि त्यातील मानवी विचार, व्यवहार व्यवस्थापित करण्याची दृष्टीच बदलून जाते.

अमेरिकेतील अलमेडा येथे १८ एप्रिल १९०० रोजी बोलताना; प्रकाशाचे कंपन किंचित कमी वा जास्त झाल्यास सारे काही बदलून जाते हा पदार्थ विज्ञानशास्त्राचा सिद्धांत सांगून, स्वामीजी अंतिम सत्याच्या संदर्भात विज्ञानाच्या अनिश्चिततेकडे लक्ष वेधतात. विज्ञानविश्वात science of uncertainty ची चर्चा सुरू होण्याच्या कितीतरी आधीच स्वामीजींनी याकडे लक्ष वेधले होते हे लक्षणीय म्हणावे लागेल.

अमेरिका व युरोपातील पहिला प्रवास आटोपून १५ जानेवारी १८९७ रोजी स्वामीजींनी कोलंबो येथे भारतीय भूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्यावेळी त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या स्वागताला त्यांनी कोलंबो येथील फ्लोरल हॉल येथे दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ जानेवारी १८९७ रोजी उत्तर दिले. आधुनिक विज्ञानाच्या शोधांनी अपक्व अशा धर्ममतांवर प्रचंड आघात केले असून त्यांचा पाया डळमळला आहे आणि ते भयभीत झाले आहेत असे स्पष्ट करून, वेदांताच्या पायावरील धर्माला मात्र त्यामुळे किंचितही ढळ लागत नाही; असे नि:संदिग्ध प्रतिपादन स्वामीजींनी केले. विश्वाची निर्मिती करणाऱ्या ईश्वराची संकल्पना या विज्ञानामुळे मागे पडत असून वेदांताची तत्वे अधिक स्वीकारली जाण्याचा काळ आला असल्याचेही ते म्हणाले. याच वेळी एक फार महत्त्वाचा इशारा देताना स्वामीजी म्हणतात, ‘भारताबाहेरील देशांमध्ये पडणाऱ्या भारतीय धर्माच्या प्रभावासंबंधी बोलताना, ज्यांच्या पायावर भारतीय धर्माची इमारत उभारली गेली आहे ती मूलतत्त्वे हाच भारतीय धर्म या शब्दांचा अर्थ मला अभिप्रेत आहे. त्याच्या शाखाप्रशाखा, शेकडो शतकांच्या सामाजिक आवश्यकतेनुसार त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या साऱ्या लहानसहान गौण बाबी, त्याचप्रमाणे भिन्नभिन्न प्रथा, रूढी, सामाजिक कल्याणाबाबतचे बारीकसारीक तपशील वगैरेंचा वास्तविकदृष्ट्या धर्म या शब्दात अंतर्भाव होऊ शकत नाही.’ संपूर्ण जगाच्या आणि भारताच्या/ हिंदूंच्या धर्मविचाराला पुढे घेऊन जाणारा, अधिक व्यापकता व खोली प्रदान करणारा आणि मानवाच्या धर्मविचाराला अधिक पूर्णता प्रदान करणारा हा विचार आहे.

स्वामीजींच्या विज्ञानविषयक प्रतिपादनाचा काही परिणाम त्या क्षेत्रातील आणि अन्य क्षेत्रातील धुरिणांवर होत होता का, या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे आहे. त्यासाठी एक उल्लेख पुरेसा आहे. इ.स. १८९६ च्या फेब्रुवारी महिन्यात स्वामीजी सारा बर्नहार्ड या फ्रेंच अभिनेत्रीची भगवान बुद्धांच्या जीवनावरील नृत्यनाटिका बघायला गेले होते. त्यांना सभागृहात पाहून बर्नहार्ड यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भेट ठरवण्यात आली आणि भेट झालीही. स्वामीजी व बर्नहार्ड यांच्या भेटीच्या वेळी बर्नहार्ड यांच्यासोबत टेस्ला नावाचे एक थोर इलेक्ट्रिशियन हेदेखील भेटीस आले होते, असा उल्लेख स्वामीजींनी इंग्लंडमधील ई. टी. स्टर्डी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. टेस्ला हे साधेसुधे व्यक्तिमत्व नव्हते. आधुनिक विद्युतशास्त्रातील alternating current पद्धतीचे ते जनक आहेत. २६ देशांची ३०० पेटंट मिळवणाऱ्या निकोला टेस्ला यांना १९१५ साली नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता परंतु त्यांनी तो नाकारला असे त्यांच्या चरित्रकारांचे म्हणणे आहे. ते काहीही असले तरी, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ६ नोव्हेंबर १९१५ रोजी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केले होते. नंतर १५ नोव्हेंबर १९१५ रोजी मात्र स्टॉकहोम येथून दुसरेच नाव जाहीर करण्यात आले होते हा इतिहास आहे. याशिवाय टाईम मासिकाने वयाची ७५ वर्षे पूर्ण केली तेव्हा टेस्ला यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर छापले होते. तसेच आईन्स्टाईन यांच्यासह ७० नामांकित शास्त्रज्ञांनी टेस्ला यांना पत्रे पाठवून त्यांचे अभिनंदन केले होते. अशा या थोर शास्त्रज्ञाने स्वामीजींशी भरपूर चर्चा केली होती. त्याबाबत स्टर्डी यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी लिहितात, ‘वेदांतातील प्राण, आकाश आणि कल्प यांच्याविषयीचे सिद्धांत ऐकून श्री. टेस्ला मुग्ध होऊन गेले. त्यांच्या मते आधुनिक विज्ञान केवळ याच सिद्धांतांना मान्यता देऊ शकते. तसेच आकाश आणि प्राण या दोघांची उत्पत्ती विश्वव्यापी महत, समष्टी मन, ब्रम्हा किंवा ईश्वर यातून होत असते. शक्ती आणि जडद्रव्य यांचे अव्यक्त शक्तीत रूपांतर करता येऊ शकते हे आपण गणिताच्या आधारे सिद्ध करू शकू, असे श्री टेस्ला यांना वाटते.’

स्वामीजींच्या विज्ञानविषयक विचारांचा प्रभाव विज्ञान क्षेत्रातील तज्ञांवरही कसा होत होता याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. स्वामीजींच्या नंतर काळ आणि विज्ञान खूप पुढे आले आहे. धर्म व विज्ञान यांचे ऐक्य व्हावे लागेल आणि त्यासाठी दोघांनाही एकमेकांना बऱ्याच सवलती द्याव्या लागतील, असे प्रतिपादन स्वामीजी करीत असत. धर्म व विज्ञानाच्या एकीकरणातूनच भावी जगाची उभारणी होईल आणि सुखसमाधानाची प्राप्ती होईल, असेही स्वामीजी म्हणत. आज तो काळ आल्याचे सगळ्यांना जाणवते आहे. त्याचे नेमके स्वरूप कसे राहील याचा विचार करताना स्वामीजींचे विचार ध्यानी घेण्याला पर्याय नाही.

  • श्रीपाद कोठे
    गुरुवार, १२ जानेवारी २०२३
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा