शिक्षक मतदारसंघ निवडणूक : जुन्या पेन्शन योजनेवरून भाजपला घेरण्याची विरोधकांची तयारी

0

नागपूर (NAGPUR): नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात रिंगणातील (Nagpur Teachers Constituency Election)उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यावर आता मुद्यांची चर्चा सुरु झाली आहे. उमेदवारांनी शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षक मतदारांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. या भेटीगाठींमध्ये शिक्षकांचे मुद्दे चर्चिले जात आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरतोय जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी. २००५ नंतर बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याचे आमिष काँग्रेस, आम आदमी पार्टीकडून दाखवले जात आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा या दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात मतदारांवर बिंबविला जात असल्याने भाजपच्या गोटात चिंता निर्माण झाल्या आहेत. ही योजना लागू करणे शक्य होणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्पष्टपणे सांगून टाकल्याने ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ची घोषणा करणाऱ्या नागो गाणारांवर तोंडघशी पडण्याची पाळी आली आहे. नेमका त्याचाच प्रचार विरोधकांकडून सुरु झाला आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ही निवडणूक चर्चेत राहिली आहे. अवघ्या एकोणचाळीस हजारांच्या घरात मतदार असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल 22 उमेदवार लढत देत असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजानाचा धोका निर्माण झाला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने अगदी वेळेवर नागो गाणार यांचे नाव पुन्हा फायनल केले. प्रचंड गोंधळानंतर विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना काँग्रेस व महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला. पदवीधर निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने नाराज झालेल्या शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे यांच्या रुपाने आपला उमेदवार मैदानात उतरविला तर दुसरीकडे नागपुरात आपला बेस तयार करण्याच्या हेतूने सक्रीय झालेल्या आम आदमी पार्टीने देवेंद्र वानखेडे यांना मैदानात उतरविले आहे.

बहुजन आघाडीचे दीपकुमार खोब्रागडे, बसपाच्या रिमा रंगारी, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे मतविभाजन टाळत एकगठ्ठा मते मिळविण्याची कसरत प्रस्थापितांना करावी लागणार आहे.

गाणारांच्या चिंता

शिक्षक परिषदेच्या आमदार नागो गाणारांना भाजपने पुन्हा संधी दिल्याने त्यांच्याबद्धल थोडीफार नाराजी आहेच. पण, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा भाजपसाठी चिंता विषय ठरतो आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनाही हा धोका जाणवत आहे. जुनी पेंशन योजना नाकारण्याची भाजप नेतृत्वाची स्पष्ट भूमिका गाणारांच्या अंगलट येणार का, हा सध्या चर्चेचा विषय आहे. स्वतः नागो गाणार हे जुन्या पेन्शन योजनेच्या बाजुने आहेत व त्यांनी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ ही घोषणाच केलेली आहे. तर दुसरीकडे शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि काँग्रेस समर्थिक सुधाकर अडबाले यांचाही प्रचार जुनी पेंशन योजनेवर आधारित आहे. किंबहुना या दोन्ही उमेदवारांनी शिक्षकांच्या दृष्टीने तो भावनिक मुद्दा करून शिक्षकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा