इंदूर : इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर तिसरा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ गड्यांनी सहज मात केली. उत्कृष्ट गोलंदाजी तसच संयमी फलंदाजीच्या जोरावर कांगारुंनी हा सामना खिशात घालत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border-Gavaskar Trophy Test Series) ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम राखले आहे. या मालिकेत भारताने पहिले दोन कसोटी सामने जिंकले असून सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. फिरकीपटूंना लाभदायक ठरणाऱ्या धावपट्टी तयार करणे यजमान भारताला महागात पडले (IND vs AUS 3rd Test). फिरकीच्या जाळ्यात कांगारूंना अडकविण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ स्वतःच त्या जाळ्यात अडकला. संपूर्ण सामन्यावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले
पहिल्या डावात भारताचा संघ केवळ 109 धावांवर बाद झाला. भारताकडून शुभमन गिल (21 धावा) आणि विराट कोहली (22 धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने 197 धावांवर रोखले. 88 धावांनी माघारलेला भारतीय संघ पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर 163 धावाच करु शकला. चेतेश पुजाराच्या 59 धावांमुळे भारताला ही धावसंख्या तरी गाठता आली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावाचं माफक लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने केवळ 1 विकेट गमावत ट्रेव्हिस हेडच्या नाबाद 49 आणि लाबुशेनच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर सामना सहज खिशात घातला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला असून भारताला त्यात प्रवेशासाठी आगामी अहमदाबाद कसोटी कुठल्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे.