विधानसभा निवडणुकीत तणाव: सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेस उमेदवाराची धक्काबुक्की

0

बल्लारपूर मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढत असून, राज्याचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे समर्थकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुनगंटीवार यांचे सुरक्षारक्षक वेळेत हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळण्यात यशस्वी झाले. ही घटना मूल तालुक्यातील कोसंबी येथे घडली.

मुनगंटीवार गावातील तलावाच्या समस्यांवर कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत व त्यांच्या समर्थकांनी अचानक येऊन वातावरण तणावपूर्ण केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काँग्रेसचे विजय चिमड्यालवार व राकेश रत्नावार यांना ग्रामस्थ महिलांकडून मारहाण झाल्याचे समजते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांचा चष्मा फुटल्याचेही सांगण्यात आले.

सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस उमेदवारांना शांततेने समजावत, आपण समस्या समजून घेत आहोत, हे आपले काम आहे, असे सांगितले. मात्र, काही काँग्रेस समर्थकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

पोलीस हस्तक्षेपाची मागणी:
घटनेनंतर मुनगंटीवार यांनी पोलिसांच्या हस्तक्षेपाची मागणी करत घटनास्थळ सोडण्यास नकार दिला. दुसरीकडे काँग्रेस समर्थकांनी मुल पोलीस ठाण्यात जाऊन भाजप कार्यकर्त्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

राजकीय वातावरण तापले:
2009 पासून सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मतदारसंघातून निवडणुकीत सहभागी होत आहेत. मात्र, अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याचे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. सुधीर मुनगंटीवार हे संयमी आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विरोधात झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.