काँग्रेस अध्यक्षांच्या डिनरवर ठाकरे गटाचा बहिष्कार, काय आहे कारण?

0

    नवी दिल्लीः राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना उद्धव ठाकरे गटाची गोची झाली आहे. या मुद्यावर ठाकरे गटाची राजकीय कोंडी होण्याची शक्यता दिसत असताना आज ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय (Uddhav Thackeray Group Boycott Congress Dinner Party ) घेतला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करताना सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी सायंकाळी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी त्यांच्या घरी जेवणाचे आयोजन केले आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी “माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कोणाची माफी मागत नाहीत”, असे म्हटले होते. त्यावरून राजकीय रणकंदन माजले आहे. राजकीय कोंडी झालेल्या उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथील जाहीरसभेत राहुल गांधींना इशारा दिला. सावरकर हे आमचे दैवत असून कृपा करून त्यांचा अपमान करू नका, तो आम्हाला अजिबात पटणारा नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. आता उद्धव ठाकरे गटाने खर्गे यांच्या डिनरवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सावरकरांचा अवमान सहन करणार नाही म्हणजे नेमके काय, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोडा मारला होता, याचे स्मरण करुन देताना मुख्यमंत्र्यांनी तेव्हाचे छायाचित्रही आज भर पत्रकार परिषदेत दाखवले.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा