पुणे: पुण्यातील दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत असून त्या जागा नेमक्या कोणी लढवाव्या, यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे दिसून आले. या दोन्ही जागा लढविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले असताना चिंचवडच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे (Kasba & Chinchwad Bypoll ). या दोन्ही जागा भाजपकडे होत्या व आमदार दिवंगत झाल्याने त्या रिक्त झाल्या आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याच्या भाजपच्या आवाहनाला महाविकास आघाडीकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची असल्याचे सांगितले. तर पुण्यातील कसबापेठेच्या जागेबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीने ठरवावे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपने आम्हाला परंपरा शिकवू नये, असे सांगून खासदार संजय राऊत म्हणाले की, काल पार पडलेल्या बैठकीत निवडणूक टाळता येईल का? यावरही चर्चा झाली. मात्र, त्यात निवडणूक लढवावी, असाच विचार पुढे आला असल्याने निवडणूक होईलच, असे ते म्हणाले. आम्ही निवडणुकीतून दूर राहिलो तरीही ती होणार असून काही अपक्ष निवडणुकीत उतरतील आणि निवडणूक होईल, असे राऊत म्हणाले. नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या होत्या. अंधेरीत भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांनी न लढण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राऊत यांनी केला. दरम्यान, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवडची जागा सोडणार का, याकडे लक्ष लागलेले आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा लढवावी, असे आवाहन पक्षाला गेले आहे. ही जागा राष्ट्रवादीने अन्य कोणत्याही पक्षासाठी सोडू नये, असे मतही स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.