तिरुवनंतपूरमः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी संरक्षण मंत्री ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसला टाटा (Son of Former Minister A K Antony’s son resigns from Party) केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बीबीसीच्या माहितीपटाला अनिल अँटनी यांनी विरोध दर्शविला होता. मात्र, काही वेळातच त्यांच्यावर ट्विट काढून टाकण्यासाठी पक्षाकडून दबाव आणला गेला. त्यामुळे अँटनी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले. अनिल अँटनी यांनी नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या माहितीपटास विरोध दर्शवितानाच मोदींचे समर्थन केले होते. अँटनी यांनी राजीनाम्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून माझ्यावर ट्विट डिलीट करण्यासाठी दबाव आणला गेलाहोता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या लोकांकडून हा दबाव आणला गेलो होता. मात्र, मी त्यांना नकार दिला, असेही ते म्हणाले.
अलिकडेच बीबीसीच्या माहितीपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या माहितीपटाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. अनिल अँटनी यांनी ट्वीट करून या माहितीपटाला आपला विरोध दर्शविला होता. भाजपाशी आमचे वैचारिक मतभेद असले तरी माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. या माहितीपटाचे समर्थन करणारे लोक चुकीचा पायंडा पाडत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते. केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी घातलेली असून युट्यूब व ट्विटरला देखील तसे सांगण्यात आले आहे.
जेएनयूत वाद
दरम्यान, डाव्या चळवळीचे केंद्र ठरत असलेल्या जेएनयूमध्ये हा माहितीपट दाखविण्यावरून मंगळवारी रात्री मोठा वाद झाला होता. या विद्यापीठात एका विद्यार्थी संघटनेकडून माहितीपटाचे सादरीकरण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील वीज व इंटरनेट बंद करण्यात आले होते.