नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तब्बल साडेसहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून श्रद्धाची हत्या का करण्यात आली, याबाबतचा (Shraddha Walker Murder Case) निष्कर्षही पोलिसांनी आरोपपत्रातून काढला आहे. घटनेच्या दिवशी श्रद्धाने तिच्या एका मित्राची भेट घेतली होती व त्या भेटीमुळे संतापलेला तिचा लिव्ह इन (Live in) पार्टनर आफताब पुनावाला (aftab poonawalla) याने तिची हत्या केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. आफताबच्या न्यायालयीन कोठडीत ७ फेब्रुवारीपर्यंत वाढ झालेली आहे. प्रचंड गाजलेल्या या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी सुमारे दिडशे जणांची साक्ष नोंदविली आहे. या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल पुरावे देखील गोळा केलेले आहेत.
नराधम आफताब याने श्रद्धाची हत्या (Shraddha’s murder) का केली, त्यामागे नेमके कोणते कारण होते, याचा शोध पोलिसांनी घेतला. घटनेच्या दिवशी श्रद्धाने तिच्या एका मित्राची भेट घेतली होती. आफताब त्या मित्राचा राग करायचा. त्यामुळे श्रद्धा घरी परतल्यावर आफताब संतापाने बेफाम झाला होता. रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केली व नंतर हे प्रकरण दडपण्यासाठी त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. त्यासाठी त्याने विविध हत्यारांचा वापर केला, असे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दाखल केलेल्या ६६२९ पानांच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात दिल्लीच्या मेहरौली पोलिसांनी सुमारे दिडशे जणांची साक्ष नोंदविली आहे. आफताबवर भारतीय दंड विधान कलम ३०२ (हत्या) व २०१ (पुरावे नष्ट करणे) हे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात आफताबला १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.