निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, उद्या याचिका दाखल होणार

0

मुंबई : शिवसेना पक्ष व धनुष्यबाणावरील शिंदे गटाचा दावा मान्य करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली (Uddhav Thackeray to file Petition in SC ) आहे. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत ‘तातडीचा’ ​​उल्लेख केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करून घेण्यास नकार देत त्यांना उद्या दाखल करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाखल झालाय. ही याचिका आजच सर्वोच्च न्यायालयापुढे मांडण्याचे ठाकरे गटाचे प्रयत्न होते. दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरुच असताना न्यायालय दोन्ही मुद्यांवर एकत्रित सुनावणी करणार की काय, याकडे लक्ष लागलेले आहे.
विधिमंडळ कार्यालय ताब्यात
विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. कार्यालयातील आधीचे फलक व बॅनर हटवण्यात आले आले.
पवारांचा ठाकरेंना फोन
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केल्याची माहिती आहे. आगामी कायदेशीर लढाईबाबत यावेळी चर्चा झाली. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास पवार यांनी दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.