चंद्रपुरात आजी माजी पालकमंत्र्यांचा एकत्रित विजय!

0

काँग्रेस आमदारानेच केला खासदाराचा ‘गेम’

चंद्रपूर. बाजार समितीच्या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यभरात वेगळेच राजकारण शिजताना दिसले. शुक्रवारी मतदान प्रक्रियापार पडल्यानंतर शनिवारी निकाल जाहीर झाले. चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 12 जागांवर भाजप आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलला विजय मिळाला आहे. निवडणुकीसाठी विद्यामन पालकमंत्री व भाजप नेते सुधीर मुगंटीवार (Guardian Minister and BJP leader Sudhir Mugantivar ) आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार (former Guardian Minister Vijay Wadettivar ) यांच्यात युती झाली होती. त्यांच्या पॅनलने दणदणीत विजय साजरा केला. या दोन्ही नेत्यांनी मिळून काँग्रेसचे (Congress) राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) समर्थित शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. हा धानोरकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. स्थापनेपासून काँग्रेसकडे असलेली चंद्रपूर बाजार समिती आता काँग्रेस आणि भाजपाच्या (BJP) ताब्यात असले.

चंद्रपुरात बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचे वेगळे पॅनल मैदानात उतरविले होते. तर भाजपच्या मतदीने विजय वडेट्टीवार यांनी दुसरा पॅनल केला होता. त्यामुळे मुख्य लढत ही काँग्रेसमध्येच झाल्याचे चित्र होते. काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

चंद्रपूर आणि राजुरा बाजार समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप युतीला मोठे यश आले आहे. या युतीने चंद्रपूर बाजार समितीच्या 12 तर राजुरा बाजार समितीच्या 15 जागा बळकावून दोन्ही ठिकाणच्या सत्ता उलथवून टाकल्या आहे. राजुऱ्यात आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व बघायला मिळाले. आमदार बंटी भांगडिया यांच्या चिमूर मतदार संघातील चिमूर व नागभीडमध्ये भाजप समर्थित आघाडीला भरघोष यश मिळविले आहे. चिमूरात तब्बल 18 पैकी 17 तर नागभीड बाजार समितीमध्ये 14 जागांवर यश मिळविले आहे. यामध्ये चिमूरात पहिल्यांदाच भाजपने बाजार समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही बाजार समित्यांवर काँग्रेस आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित करीत भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिंदेवाहीत काँग्रेसने येथे 18 पैकी 11 जागांवर विजय मि‌ळवित भाजपची सत्ता उलथवून टाकली आहे. ब्रह्मपुरीतही काँग्रेसने 18 पैकी 14 जागा जिंकून सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे.

मूल कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. एकीकडे आमदार विजय वडेट्टीवार गटाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तर दुसरीकडून खासदार धानोरकर गटाची धुरा माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश मारकवार आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांच्या खांद्यावर होती. मात्र ही निवडणूक एकतर्फी झाली. संतोष रावत यांच्या आघाडीने सर्व 18 जागांवर विजय संपादन करून दुसऱ्या गटाचा धुव्वा उडविला. वरोरा बाजार समितीचा निकाल हाती आलेला नव्हता. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मनसे युतीचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळाली. येथे खासदार धानोरकर आणि शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढले.