चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाकडे अवघ्या देशाचे लक्ष

0

श्रीहरिकोटा- चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असून चांद्रायन-३ ची उलटगणना गुरुवारी दुपारी सुरु होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या शुक्रवारी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ चे प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेला देवाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील व्यंकटाचलपती मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यावेळी शास्त्रज्ञांनी त्यांच्यासोबत चांद्रयान-३ चे लघु मॉडेलही सोबत घेतले होते. ही मोहिम यशस्वी ठरल्यास भारत हा चंद्रावर राष्ट्रध्वज पाठविणारा चौथा देश ठरणार आहे. याशिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देशही ठरणार आहे. त्यामुळे साऱ्या देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे.
चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण उद्या झाल्यास २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. ते पुढील १४ दिवस रोव्हर लँडरभोवती ३६० अंशात फिरेल आणि अनेक चाचण्या हाती घेईल. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरने केलेल्या चाकांच्या खुणांची छायाचित्रे देखील पाठवणार आहे. तिरुपती येथील मंदिरात प्रार्थना केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, चांद्रयान-३ चा प्रवास उद्या सुरु होमार आहे. सर्वकाही सुरळीत राहिल्यास २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर ते लँड होईल. चंद्रावर ते विविध चाचण्या पार पाडणार आहे. याशिवाय छायाचित्रे देखील पाठवणार आहे.