कोलोरी शिवारात दहशत निर्माण करणाऱ्या अस्वलाला वन विभागाने केले जेरबंद

0

बुलडाणा- खामगाव तालुक्यातील कोलोरी परिसरात मागील अनेक दिवसांपासून एका अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आज खामगाव वन परिक्षेत्रातील जनुना बीट मधील कोलोरी गावाच्या शिवारात एका मक्याचे शेतात ही अस्वल बसून असल्याची माहिती बुलडाणा वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला मिळाली. बुलढाणा डीएफओ अक्षय गजभिये यांचे आदेशाने व एसीएफ रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ रेस्क्यू टीमला घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी खामगाव आरएफओ पडोळ, पशुधन अधिकारी डॉ अवताळे हे हजर होते. ज्या शेतात अस्वल बसलेले होता त्याच्या आजूबाजूच्या बऱ्याच अंतरापर्यंत जंगल नसल्याने अस्वलाला जेरबंद करण्यासाठी अखेर ट्रांक्युलाईज करण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदुकीच्या मदतीने अस्वलाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारल्याने काही वेळातच अस्वल बेशुद्ध झाले. यानंतर त्याला पिंजऱ्यात बंद करून खामगाव वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून वैधकीय तपासणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अस्वलाला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती रेस्क्यू टीमने दिली आहे. ही कामगिरी बुलडाणा रेस्क्यू टीमचे रामेश्वर वायाळ, राहुल चौहान, समाधान मानटे, संदीप मडावी, कैलाश तराळ, पवन वाघ, प्रवीण सोनुने आदींसह खामगाव वन विभाग कर्मचाऱ्यांनी केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा