
जी – २०च्या नावावर फुटपाथ दुकानदारांवर अशीही कारवाई !
नागपूर — जी २० परिषदेच्या नावावर शहरात स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची मोहीम राबवताना, दाखल होणाऱ्या विदेशी पाहुण्यांसमोर गरिबीचे प्रदर्शन नको म्हणून, नागपुरातील फुटपाथ दुकानदारांना प्रशासनानं टार्गेट केलं आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली त्यांचा माल माल जप्त केला जात आहे हे आपल्याला माहीत आहेच. मात्र, कारवाईच्या नावाखाली जप्त केलेला माल, उपजिविकेची त्याची इतर साधनं, उद्धवस्त करण्याचा घाट मात्र अनाकलनीय अन् लाजिरवाणा ठरला आहे.
असाच एक धक्कादायक प्रकार शहराच्या सेमिनरी हिल्स परिसरात समोर आला आहे. जिथे मनपाच्या धरमपेठ झोन कर्मचाऱ्यांनी गरीब फुटपाथ दुकानदारांचे ठेले आणि दुकानातील साहित्य व माल जप्त करून सरळ मातीच्या ढिगाऱ्यात दाबून टाकला आहे. पीडित दुकानदार राजेश जयस्वाल याने सांगितले की, शहराच्या सेमिनरी हिल्स परिसरातील गौरखेडे कॉम्प्लेक्स समोरील मैदानात अनेक दुकानदारांचा विक्रीसाठीचा माल आणि इतर वस्तू डंप करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मनपाच्या धरमपेठ झोनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली होती.
राजेश जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना दुकान न लावण्यासाठी धरमपेठ झोन च्या कर्मचाऱ्यांनी मनाई केली होती. त्यामुळे दुकान न लावता दुकानदारानी आपला माल रस्त्याच्या कडेला लागलेल्या भिंतीच्या मागे लपवून ठेवला होता. मात्र, याबाबत माहिती मिळताच मनपा चे कर्मचारी आले आणि त्यांनी उसाचा हा ढीग, फुटाळा परिसरातून उचलून सेमिनरी हिल्सच्या गौरखेडे कॉप्लेक्स जवळील मैदानात नेऊन टाकला आणि दुकानदाराल फोन वर सूचना देऊन माल परत पाहिजे असल्यास २ हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकीही दिली. यायच्या आधीच त्याचा उसाचा माल मैदानात फेकून दिला. माझा माल का फेकला असं विचारल्यामुळे तसेच पैसे देण्यास नकार दिल्यामुळे मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तू मुजोर आहेस आता तुला माल मिळणार नाही असे बोलून जेसीबी मशीनच्या साहाय्याने पूर्ण माल मातीच्या ढिगाऱ्यात दाबून टाकला. विशेष म्हणजे फक्त रसवंतीच्या ठेल्यावरच नाही तर चहाच्या टपऱ्या, चायनीजच्या ठेल्यावरही कारवाई करून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी ठेले , गॅस शेगडी, स्वयंपाकाचे साहित्य आणि दुकानाच्या साहित्य आदी माल जेसीबीच्या साहाय्याने मातीच्या ढिगाऱ्यात पुरून टाकल्याचे समजते.
या घटनेची चाहूल लागताच काही समाजसेवकांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. जी २० च्या नावावर कारवाई करण्याच्या नावाखाली झालेला हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा, धक्कादायक आणि दुर्दवी असून, कारवाईच्या नावाखाली गरिबांचे कुटुंब उधवस्त करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी फुटपाथ दुकानदारांनी केली आहे.