लग्न बाजारातील घोडे वठणीवर आणायला हवे

0

 

पुरुषोत्तम आवारे पाटील

संवाद -9892162248

लग्न दोन कुटुंबातील स्नेहबंध असतात,काही नाती या निमित्ताने नव्याने निर्माण होतात आणि मर्यादित आकाश असणाऱ्यांना नात्यांचे मोकळे आकाश मिळते. नात्यांच्या विस्तारलेल्या पटावरून त्या त्या परिसरातील चालीरीती,संस्कृती समजून विचारांची देवाणघेवाण व्हायला सुरुवात होते. दोन्ही कडील कुटुंबाला स्नेहबंधासाठी नवी दालने उघडी होत जातात.

अलीकडे या सगळ्यांना बाजूला सारत वर पक्षातील मंडळींचा उच्छाद एवढा वाढला आहे की त्यापुढे वधूपक्ष मजबुरीने नाक घासताना दिसतात. लग्न संबंध जुळविताना जे लोक मध्यस्त असतात ,त्यांच्यात ज्या बाबी ठरल्या नाहीत त्या वेळेवर उकरून काढीत वर आणि त्याचे मित्र वधूच्या नातेवाईकांना ज्या पद्धतीने अपमानित करतात त्यावरून भावी काळात यांची नाती कशी असतील याचा अंदाज येतो. अलीकडे ज्या बातम्या कानावर येतात त्यात कुठे वराला मारहाण होते तर कुठे लग्न चार तास उशिरा लागले म्हणून मुलगी दुसऱ्याच मुळाशी लग्नगाठ बांधून मोकळी होते.

वर पक्षाची दांडगाई आणि बेशिस्त बघून नाईलाजाने असे म्हणावे लागते की अश्या आणखी काही घटना प्रत्येक तालुक्यात घडायला हव्यात. लग्नाची तिथी काढताना वेळ अगदी तास आणि मिनिटे या क्रमाने काढला जातो मात्र तो पाळण्याची जबाबदारी जणू आपली नाहीच अश्या बेताने नवरा मुलगा आणि त्याचे मित्र वागतात तेव्हा मुलीच्या पित्याच्या डोळ्यात अश्रू आणि चेहरा केविलवाणा झालेला असतो कारण मुलगी बोहल्यावर येऊन बसलेली असते ,नवरदेव मात्र वेळ टळून गेली तरी मंडपात यायचे नाव घेत नाही. लग्न ठरलेल्या वेळेवर लागावे असे दुर्दैवाने ८० टक्के लोकांना वाटत नाही त्याचे भयंकर मनस्ताप उपस्थित पाहुण्यांना भोगावे लागतात. लग्नाची दाट तिथी असलेल्या दिवशी अनेकांना एकाच दिवशी अनेक लग्नांना हजेरी लावायची असते पण एकही लग्न वेळेवर लागत नसल्याने ते शक्य होत नाही. वेळेवर लग्न लागत नसतील तर मुहूर्त काढताना तास,मिनिटे आणि सेकंदाचा विचार तरी का करावा ?
मागच्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यात एका नवरदेवाने वेळेच्या बाबतीत अति केली,दुपारी चार ही लग्नाची वेळ टळून पुढे चार तास उलटून गेले तरी नवरदेव मित्रांसोबत डीजे लावून नाचत असल्याचे लक्षात आल्यावर वधूकडील लोकांनी तात्काळ निर्णय घेत मांडवात हजर असलेला मुलगा बोहल्यावर उभा करीत त्याचे लग्न लावून टाकले. हा नवरदेव आपल्या दारुड्या मित्रासह बसला नाचत. दुसऱ्या एका घटनेत ऐनवेळी रुसून बसलेल्या नवरदेवाने चक्क बोलेरो गाडीची मागणी केली. आता वेळेवर वधूपिता बोलेरो गाडी कुठून आणणार ? मोठा पेच पडला ,शेवटी काही नातेवाईकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु नवरदेव ठरला अदृश्य शिंगे असलेला एक दिवसाचा पहेलवान, कुणालाही ऐकत नाही,कुणाचा सन्मान ठेवत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी नातेवाईकांनी त्याला एवढा चोप दिला दिला की कपडे फाटलेल्या नवरदेवाला रस्ता दिसेल तिकडे पळण्याची पाळी आली.
स्वतःची ऐपत नसताना लग्नात मात्र वधू पक्षाला अव्वाच्या सव्वा मागण्या करणे, लग्नात कोणते पदार्थ असले पाहिजेत याच यादी सुद्धा अलीकडे नवरदेव ठरवू लागले आहेत. काही जण एवढे बेशरम असतात की लग्नाची पंगत आणि स्वतःच्या गावातला स्वागत समारंभाचा खर्चही वाढू पित्याच्या खिश्यावर टाकायला मागेपुढे बघत नाहीत. अनेक नोकरदार मुले तर मुलीच्या पित्याने गादी ,पलंग दिला नाही तर त्यासाठी पण रुसून बसतात. मध्यस्थांच्या बैठकीत हुंडा तर हमखास ठरवला जातो,आम्ही हुंडा घेत नाही म्हणणारे अतिशय निर्लज्जपणे मुलीच्या पित्याकडे मुलीला किती तोळे सोने देणार असा भिकारी प्रश्न करतात आणि वरून हुंडा घेत नसल्याच्या फुशारक्या मारतात. काही महाभाग तर सगळा व्यवहार गुपचूप करून वरून आम्ही आदर्श विवाह करीत असल्याचा देखावा निर्माण करतात. लग्न व्यवहारातले असे पाखंडी लोक समाजाने उघडे पडायला हवेत.

लग्नाचा खरा अर्थ अश्या लोकांनी कधीच बाजूला फेकून घोडेबाजार सुरु केला आहे. मुलीच्या सुरक्षेपोटी पिताही संकल्पाच्या नावावर हुंडा द्यायला स्वतःहून पुढे येत आहे ,हावरट मुले शिक्षित आणि घरी श्रीमंत असूनही मुलीच्या पित्याला आणखी कसे खड्ड्यात टाकले जाईल याचे नियोजन करीत असतात. जो तरुण हुंडा उघड किंवा इतर कोणत्याही रूपाने स्वीकारून लग्न करीत असेल तर मुलींनो त्यावर कधीच विश्वास नका ठेवू,असली मतलबी माणसे कधीच कुणाचे होत नसतात. ज्याने स्वतःच्या लग्नातही व्यवहार सोडला नाही तो जीवनात व्यवहार कसा सोडेल ? नाती,माणुसकी,सामाजिक भान हे अश्या लोकांसाठी केवळ पुस्तकी शब्द असतात , पुढे हेच लोक पराकोटीचे पाखंडी बनतात आणि सामाजिक दायित्वाच्या गप्पा मारताना दिसतात. घरातील कुण्या म्हाताऱ्याला पाणी न पाजता बस स्टॅण्डवर असे लोक पानेरी लावून स्वतःची पाठ थोपटून घेत असतात.