तथागत बुध्दांच्या आयुष्यातील त्रिसंयोग

0

‘बुद्ध पोर्णिमे’ चे महत्व आपल्या देशासह, आशिया खंडात आणि जगात विशेष आहे. जगभरात मोठया उत्साहात ही पोर्णिमा साजरी केली जाते. दिल्लीमध्ये वेगवेगळया देशातील बरेच बुध्द विहार आहेत. यात बरूआ बुद्धीस्ट, श्रीलंकेचे महाबोधी विहार, कम्बोडियन बुध्द विहार आणि येथील राष्ट्रीय संग्रहालयात भगवान बुध्दांच्या अस्ती आहेत. या सर्व ठिकाणी बौध्द अनुयायी एकत्रित येऊन वैशाख बुध्द पोर्णिमा साजरी करतात. जग भारताकडे बुध्दाचा देश म्हणुन आजही पहातो. भारताला तथागत बुध्दांमुळे एक विशेष ओळख मिळाली आहे. या देशाने बुध्दांच्या तत्वज्ञानाचे ज्ञान संपूर्ण जगाला दिले आहे. आज, 5 मे ला असणारी बुध्द पोर्णिमा ही 2567 वी आहे.

काय आहे ‘बुद्ध पोर्णिमा’ ?

सिद्धार्थ गौतम यांचा जन्म हा वैशाख पौर्णिमेला लुम्बिनी येथे खुल्या आसमाना खाली निसर्गरम्य वातावरणात इ.पु 563 मध्ये झाला. महामाया या आपल्या माहेरी घरी जात असताना रस्त्यात त्यांना कळा लागल्या आणि तिथेच त्यांनी सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. त्यानंतर लगेचच काही दिवसातच महामाया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाचे संगोपण त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केले. गौतमाचे बालपण, तरूणपण त्यांच्यावर त्तत्कालीन शिक्षणपद्धीतीचे संस्कार, स्वत:ची विश्लेषण विचारशैली, त्यावेळेचे राजकीय वातावरण या सर्व परिस्थितीचा सिद्धार्थ गौतम यांच्या जीवनावर परिणाम झालेला असून त्यातूनच त्यांनी गृहत्याग केले.

सिद्धार्थ गौतम हे क्षत्रिय वंशाचे होते. त्यांच्या काळात शुद्धोधन राजाचे सौख्य हे अनेक राजांशी असल्यामुळे गृहत्याग केल्यानंतर त्यांचे मन वळविण्यासाठी त्यांना बऱ्याच राजांनी आपले राज्य ही देऊ केले होते. मात्र, सिद्धार्थ गौतम दृढ संकल्पित असल्यामुळे त्यांनी त्यांच्या विचारापासून फारकत न करता गृहत्यागाच्या त्यांच्या निर्णयावर ठाम राहीले.

त्यानंतर त्यांनी या सर्व काळात त्याकाळातील दु:खाचे मुळ कारण शोधण्यासाठी साधू, संत, ऋषी मुनी, वैचारीक, पारंपारिक विचारसरणी अनुसरण करणाऱ्या आणि समाजावर प्रभाव पाडणाऱ्या प्रभावी लोकांशी चर्चा करीत असल्याचे दिसुन येते. त्यांना त्यावेळी जो जो मार्ग योग्य वाटला तो त्यांनी अनुसरून पाहिला त्याचे परिणामही अनुभवले.

वेगवेगळ्या प्रकारची घोर तपर्श्चया केली. स्वत:ला अनेक शारिरीक वेदना दिल्या. या घोर तपर्श्चेतून काहीही साध्य होत नसून उलट शारिरीक नुकसानच होत आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी अशी अती शारिरीक वेदना देणारी तपश्चर्या सोडून दिली. स्वत:ला सशक्त केले

बिहारमधील गया येथे निरंजना नदी काठी ध्यानाला बसले. पारंपारिक विचारसरणी न पाळता. तार्कीक आणि कारणमिमांसा करणारी विचारसरणी मानवाच्या कल्याणास उपयोगी असल्याचे सांगितले. यासाठी काही मापदंड मांडले. याला पंचशील, चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग, प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात.

काय आहे हे पंचशील ? प्राणी हिंसा न करने, चोरी न करणे, व्यभीचार न करणे, खोटे न बोलणे, कुठल्याही मादक पदार्थाचे सेवन न करणे. हे अगदी ‘आम’ जनतेसाठीचा संदेश थोडक्यात पंचशीलचे पालन केले तर पुण्य आणि नाही केले तर पाप. पुण्य म्हणजे लाभ होईल तो हर प्रकारे होऊ शकतो. अनुसरण अथवा पालन नाही केले तर पाप म्हणजे आपले नुकसान होईल. हे ही तेवढे खरेच आहे. जेवढया वेळा पालन केले तेवढया वेळा लाभ आणि जेवढया वेळा पंचशील मोडले तेवढया वेळा नुकसान होईल. असे ढोबळमानाने समजु शकतो. मात्र बुध्द हा असा पहिला वैज्ञानिक आहे ज्याने मानवी दु:ख निर्माणामागची कारणमीमांसा केली. बाकी इतर सांगीतलेले तत्वज्ञान फार मोठे आहे. काही भाग भंतेंजींसाठी (माँकसाठी) लागु आहे. काही उपासकांसाठी तर काही अगदी सामान्यांसाठी आहे.

ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस वैशाख पौणिमेचा होता. गया येथे खुल्या असामानाखाली पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आहे. तेव्हा त्यांचे वय केवळ 35 वर्ष होते. ज्ञान म्हणजे काय असेल. तर मला असे वाटते जागरूक पणे जीवन जगण्याची पद्धत. ती पूर्ण वेळ डोळे उघडूनच जगता येते असे नाही तर कधी कधी शांत, एकांतात, स्वंय विश्लेषनही करने असते. त्यासाठी डोळे बंद करून जागरूकपणे आत अंर्तमनात पहाणे ही आलेच. हे ज्ञान त्यापुर्वी ही असेल पण त्याला अधिष्ठानाची जोड बुद्धांनी दिली.

सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळीपासून ते ‘तथागत बुद्ध’ झाले आणि श्रमण संस्कृतीचे प्रवर्तक ठरले. असे म्हणतात यापुर्वी ही अनेक बुद्ध होऊन गेले. परंतू त्यात सर्वात आधुनिक तथागत बुद्ध हे सिद्धार्थ गौतम जे नंतर तथागत बुद्ध झालेत ते आहेत. सिद्धार्थ गौतम हे वर्णाने क्षत्रिय होते. परंतू तथागत बुध्द झाल्यानंतर त्यांनी वर्ण व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. त्यांनी स्थापन केलेल्या धर्मात त्याकाळी सर्वच वर्णाचे लोक मोठया प्रमाणात सहभागी होते.

तथागत बुद्ध झाल्यावर त्यांनी सर्वात आधी खीर या गोड पदार्थाचे सेवन केले. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला आणि सर्वच पोर्णिमेला बुद्ध धम्म अनुसरणारे लोक खीर हा गोड पदार्थ बनवितात. तांदूळ आणि दूधापासून बनणारा खीर हा पदार्थ शेती व्यवस्थेशी निगडीत आणि सर्व सामान्यांना त्याकाळात आणि आजच्या काळातही सहज सोप्या पद्धतीने बनविता येणारा असा हा पदार्थ आहे.

तथागत बुद्धाने एका जागी बसून कधीच धम्म (निर्सगाचे नियम) देसना (प्रवचन) केले नाही. त्यांनी त्यांच्या धम्मात सामील झालेल्या भंतेनाही एका ठिकाणी बसून धम्म देसना करू नये असे सांगितले. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी मार्गदाता म्हणून फिरत राहीले. समाजाला धम्माची आवश्यकता का आहे हे पटवित राहीले. या प्रवासात सामान्य लोक, दानी लोक, समाजाला प्रभावित करणारे, व्यापारी, राजे असे असंख्य लोक प्रभावित होत गेले आणि बुद्धाने सांगितलेल्या धर्मात सामील होत गेले. त्यामुळे हा धम्म सर्वदूर पसरला. ज्यांच्याशी भारतीय उपमहाव्दीपांचे व्यापारीक संबंध होते त्यांच्या सोबत तो पसरत गेला. तीथे गेल्यावर त्या-त्या रूपात वाढत राहीला. तथागत बुद्धांनी धम्माचा प्रचार-प्रसार त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत केला. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत करीत राहीले. त्यांचे महापरिनिर्वाण झाले ते वैशाख पोर्णिमेला इ.पू. 483 कुशीनगर येथे शाल वृक्षा खाली तो ही निसर्गातच झाला. म्हणून वैशाख बुध्द पोर्णिमेचे विशेष महत्व आहे. असा त्रिसंयोग क्वचितच आहे इतिहासात.

तथागत बुद्ध सर्वांना आपलेसे वाटतात. त्यांचे छायाचित्र बडया दिवानखाण्यात असू देत अथवा झोपडीत त्यांच्याकडे बघितल्यावर ते शांत चित्त दिसतात आणि ती शांती आपल्यालाही मिळो असे मनोमन सर्वच सदिच्छतात. बुद्धांनी कोणताही कधीही दावा केला नाही. ना आग्रह केला. ते म्हणतात. ‘ऐही पस्सिको……’ म्हणजे या आणि पहा. मी मोक्षदाता नाही. मी तुमच भल करणारा नाही. पंरतु मी सांगितलेल्या मार्ग जर तुम्ही अनुसरणार तर तुमचे नुकसान होणार नाही. तुम्हाला आंतरीक शांती नक्कीच मिळेल. धम्म देयसनेतील गाथा (श्लोक) या संवादात्मकच आहेत त्यात एकेरी सांगणे असे नसुन दूहेरी आहेत. काही प्रश्न/समस्या असल्यास ते विचारणे त्यावर चर्चा करने असे संवादात्मक देयसना तथागतांनी दिलेली आहे. त्यामुळेही तो सर्वप्रिय ठरला. बुद्धांनी त्तत्कालीन पाली भाषेत धम्म देयसना दिली. त्याकाळी पाली बोली भाषा होती. बुध्दांचे सर्व तत्वज्ञान हे गाथेंमध्ये पाली भाषेतच आहे. या एकूण बौध्द साहित्याला ‘त्रिपीठक’ असे म्हणतात यात सर्वात लोकप्रिय ते ‘धम्मपद’ आहे. हा गाथांचा संग्रह असून यामध्ये बुद्ध धर्मातील त्याकाळातील प्रमुख अनुन्यायांशी झालेला संवाद आहे.

तथागत बुध्दांनी रक्ताचा थेंबही न पाडता जगात बदल घडविला. तार्किक, बुद्धीप्रामाण्यवादी, वैज्ञानिक दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्या लोकांसाठी बुध्द नेहमीच आदर्श राहीलेले आहेत. बुध्दांच्या विचारांच्या सहायाने जगल्यास जगता युद्धाची आवश्यकता कधी भासणार नाही.

सर्वांना वैशाख बुध्द पोर्णिमेच्या खूप शुभेच्छा