बस आणि कारची भीषण धडक 3 गंभीर, धापेवाडा -आदासा वळणावरील घटना

0

कळमेश्वर : तालुक्यातील धापेवाडा आदासा वळणावर कार आणि एस टी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता घडली या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र धापेवाडा तर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. भर रस्त्यात हा अपघात झाल्यामुळे सावनेर कळमेश्वर राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघात पोलीस स्टेशन हद्द सावनेर येथे येत असल्याने अपघाताची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राप्त माहितीनुसार एसटी बस क्रमांक MH 12EF6933 लोणारा गावावरून कळमेश्वर मार्गे आदासाकडे जात होती. त्याचवेळी कळमेश्वरवरून लग्न समारंभ आटोपून सावनेरकडे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 31CR6219 जात होती. दरम्यान, बस आदासाकडे वळण घेत असताना बसच्या मागे असलेली कार बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसला धडकली. या धडकेत कारच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले असून जखमीमध्ये अरविंद डहाके सावनेर,पुरुषोत्तम टेकाडे कवठा सावनेर, शारदा अरविंद डहाके सावनेर यांचा समावेश आहे तर कार चालक कृष्णा पांडे हा किरकोळ जखमी झाला. पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत.