पुणे 16 डिसेंबर : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली. या पथकाने पुणे विधानभवन येथे राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली. त्यामध्ये राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्तालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन आयुक्तालय, पाणीपुरवठा विभाग आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्याने केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार खरोखरच भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. पुढील दोन-तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २६०० कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यात सन २०१९ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केंद्राने ४७७१ कोटींची मदत केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत देण्याची अपेक्षा या वेळी राज्यातील अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली.















