नागपूर : भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर विद्यापीठातील अनियमिततांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले. वादग्रस्त एमकेसील कंपनीला परीक्षेसंदर्भात काम न देण्याचे आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्याच कंपनीला काम दिल्याचे आढळल्याचा मुद्दा दटके यांनी उपस्थित केला होता. (Monsoon Session of Maharashtra Assembly 2023) त्याची दखल घेत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. कुलगुरूंवर कारवाईसाठी राज्यपालांकडे संपूर्ण माहिती सादर करण्यात आली असून चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामाकाजाबाबत चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरून चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना संबंधितावर कारवाई करण्याचे तसेच सदर प्रकरणाचा खुलासा सादर करण्यास कळवण्यात आले होते. कुलगुरूंच्या खुलाशावर आवश्यक कारवाई करण्यासाठी राज्यपालांकडे प्रकरण सादर केले होते, असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.