काँग्रेस व मित्रपक्षांच्या तोंडी पाकिस्तानची, विभाजनवाद्यांची भाषा!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधी पक्षांवर हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळताच तेथे कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. पाकिस्तान, विभाजनवादी शक्ती, अतिरेकी प्रवृत्ती आणि भारतविरोधी शक्ती 370 रद्द करण्याची मागणी करतात, त्याचाच पाठपुरावा काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष करू लागले आहेत,असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देशविरोधी शक्तींच्या मागणीचा समर्थनाचा आरोप केला. भारतविरोधी शक्तींचीच भाषा काँग्रेस बोलत असून काश्मीरमध्ये 370 पुन्हा लागू करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानास पुन्हा तेथून हद्दपार करण्याचा हा डाव आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

अकोला येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेल्या विशाल जाहीर प्रचार सभेत बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारने केलेल्या प्रगतीचा व्यापक आढावा घेत महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले.यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल,शिवसेनेचे आनंदराव अडसूळ व महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा विभाजनवादी 370 कलम लागू करण्याच्या काँग्रेसी मानसिकतेला महाराष्ट्रात थारा देऊ नका, असे ते म्हणाले. एका देशात दोन संविधान चालणार नाही ही आमची भूमिका असून कलम 370 ची भिंत घालून काँग्रेसवाल्यांनी काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानास प्रवेश मिळू दिला नव्हता. 370 कलम रद्द करून आम्ही जम्मू काश्मीरला भारतासोबत पुन्हा जोडले, आता बाबासाहेबांचे संविधान तेथे लागू झाले असून तेथील गरीब, दलितांना आरक्षणाचा मार्ग खुला झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राने भाजपाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. या राज्यातील लोकांची देशभक्ती, राजनीतीची समज आणि दूरदृष्टी हे त्याचे कारण आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की केंद्रातील आमच्या सरकाने केवळ पाच महिन्यांतच लाखो करोडोंचे नवे प्रकल्प सुरू केले आहेत, त्यापैकी अनेक प्रकल्प महाराष्ट्राशी जोडले गेलेले आहेत. एकट्या वाढवण बंदराचा सुमारे 80 हजार कोटींचा प्रकल्प देशातील सर्वात मोठा बंदर प्रकल्प असेल. आमच्या सरकारने सत्तेच्या गेल्या दोन कार्यकाळात चार कोटी गरीबांना पक्की घरे दिली. प्रत्येक गरीबास घर मिळावे यासाठी आणखी तीन कोटी नवी घरे बांधण्याची सुरुवात केली असून महाराष्ट्रातील लाखो गरीबांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे पवित्र काम केल्याचे पुण्य आम्हाला निवडून देणाऱ्या जनतेला मिळेल, आणि घर मिळणाऱ्या लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. अजूनही कोणती कुटुंबे कच्च्या घरांत, झोपड्यांत राहात असल्याचे निदर्शनास आले, तर त्याची माहिती कळवा, माझ्या वतीने त्यांना पक्क्या घराचे आश्वासन द्या, ते मी पूर्ण करेन,अशी ग्वाही त्यांनी दिली.

देशातील 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्याची ग्वाही मी निवडणुकीआधी दिली होती, ती आमच्या सरकारने पूर्ण केली आहे. देशातील प्रत्येक वर्ग, समाज आणि धर्माच्या प्रत्येक ज्येष्ठास या योजनेचा लाभ मिळेल, देशातील ज्येष्ठांची काळजी आम्ही घेऊ, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी राज्यातील लोकांची वर्षानुवर्षाची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी दुर्लक्षित केली. ही मागणी पूर्ण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, असे ते म्हणाले. केंद्रात ज्या गतीने आमचे सरकार काम करत आहे, त्याच गतीने काम करणारे महायुती सरकार मला महाराष्ट्रात हवे आहे, असे ही ते म्हणाले.

भाजपा-महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, या विश्वासाचा पुनरुच्चार करतानाच, महायुतीच्या वचननाम्याचा हवाला देत मोदी यांनी महिलांची सुरक्षा, महिलांकरिता नव्या संधी आणि महिलांचा विश्वास वाढविणाऱ्या योजनांची यादीच जनतेसमोर मांडली.माझी लाडकी बहीण योजना, युवकांसाठी लाखो रोजगार, विकासाचे मोठे प्रकल्प आदी अनेक योजनांतून युती सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा वेग दुप्पट करत असून महायुतीचे सरकारच राज्याच्या विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असा विश्वासही श्री.मोदी यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून देशाच्या प्रगतीचा हिस्सा म्हणून त्याने अभिमानाने सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यामुळेच आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही वर्षाकाठी 12 हजार रुपये देत आहोत, कापूस उत्पादकांना अतिरिक्त मदत दिली जात आहे, पीकविम्याची योजना आणली आहे, असे त्यांनी सांगितले.

नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेसच्या परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्याने द्वेष,अनादरच केला,देशातील अनेक योजनांचे श्रेयदेखील बाबासाहेबांना न देता काँग्रेसच्या सर्वात बड्या परिवाराने लाटले, आणि देशाच्या या महानायकाचे राजकारण संपविले, असा आरोपही श्री. मोदी यांनी केला.केंद्रातील भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार बनले तेव्हाच बाबासाहेब आंबेडकारांना भारतरत्न किताब दिला, व नेहमीच बाबासाहेबांच्या देशाच्या उभारणीतील कार्याचा सन्मान केला. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेली पंचतीर्थे भावी पिढ्यांचे प्रेरणास्थान आहेत, पण गेल्या पंचाहत्तर वर्षांत एकदा तरी काँग्रेसच्या शाही परिवारातील कोणी या पंचतीर्थांचे दर्शन घेतले असेल, तर देशाला दाखवून द्या, असे आव्हान मोदी यांनी काँग्रेसला दिले. काँग्रेसने आजपर्यंत कधीही बाबासाहेबांच्या दिल्लीतील स्मृतिस्थळास भेट दिलेली नाही, काँग्रेसच्या एका तरी नेत्याने तेथे भेट देऊन बाबासाहेबांना वंदन केले का, असा सवाल करून, संविधानाविषयीचे काँग्रेसचे प्रेम बेगडी व फसवे आहे. आता तर संविधानाच्या नावाने कोऱ्या कागदाची पुस्तके फडकावून काँग्रेसवाले देशाची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

आता डिजिटल चलनाचा जमाना आला आहे, आणि आम्ही या चलनाच्या व्यवहारासाठी भीम युपीआय विकसित करून बाबासाहेबांचा सन्मान केला, असे ते म्हणाले.भविष्यात जेव्हा शंभर टक्के डिजिटल चलनांद्वारे व्यवहार सुरू होतील, तेव्हा देशातील प्रत्येकजण दररोज बाबासाहेबांचे स्मरण करेल, असे काम आम्ही केले आहे, असे ते म्हणाले.

शाही परिवाराचे ‘एटीएम’!

महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे, पैशाची उधळपट्टी, महाआघाडी म्हणजे टोकन मनी, बदल्यांचा धंदा, अशी अनेक विशेषणे लावून पंतप्रधानांनी महाआघाडीच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले.जेथे काँग्रेस मित्रपक्षांची सरकारे बनतात, ते सारे काँग्रेसच्या शाही परिवाराचे एटीएम म्हणून काम करू लागतात, असेही ते म्हणाले. अलीकडे हिमाचल,तेलंगणा व कर्नाटकासारखी राज्ये या परिवाराचे एटीएम बनले असून महाराष्ट्रातील निवडणुकांच्या नावावर कर्नाटकात, तेलंगणात वसुली दुप्पट झाल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. कर्नाटकात दारूच्या नावाने सातशे कोटींची वसुली केल्याचा आरोप असून महाराष्ट्रात ही आघाडी सत्तेवर आली तर काय धुमाकूळ घालेल याची कल्पना करा, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला. महाआघाडीच्या महाघोटाळेबाजपणाला महाराष्ट्रात थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

मजबूत काँग्रेस म्हणजे मजबूर देश !

देश कमजोर झाला तर काँग्रेस मजबूत होईल, आणि काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल, म्हणूनच जातीजातींमध्ये संघर्ष माजविण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. यामुळेच काँग्रेसने गेल्या 75 वर्षांत देशातील आदिवासी, अनुसूचित जातीजमातींना संघटित होऊ दिले नाही. असे झाले तरच सत्ता मिळविणे सोपे होईल, असा काँग्रेसचा कांगावा आहे. संघटित रहाल तर सुरक्षित रहाल व काँग्रेसला त्यांचा धोकादायक डाव साधता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हरियाणाच्या जनतेने हा धोका ओळखून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले, याचा दाखलाही त्यांनी दिला.