नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडी सरकार पडलं”.. नेत्यांची आडवळणाने टीका

0

मुंबईः शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. हे जगजाहीर असले तरी आता सरकार कोसळण्याचीही अनेक कारण दिली जात आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही (State Congress President Nana Patole) त्यासाठी जबाबदार धरले जात आहे. पटोलेंनी विधानसभाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार टिकले असते, त्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय घिसाडघाईचा आणि अपरिपक्व होता, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आहे. सरकार पडण्यामागे ते मुख्य कारण होते, असा दावाही त्यातून करण्यात आलाय. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात नमूद केलेय की, “महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले, त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते आणि पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही आणि त्याचाच फायदा पुढे ‘खोके’ बाज आमदार आणि त्यांच्या दिल्लीतील ‘महाशक्ती’स मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा आणि अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले, हे सत्य मान्य करावेच लागेल.”

दरम्यान, काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी संजय राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. नवीन अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी अनेकांच्या भावना होत्या की, नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको हाता. नानाभाऊंनी राजीनामा दिला नसता तर हे सरकार टिकले असते, अशा सर्वांच्या भावना होत्या”

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा