लग्न सोहळ्यावर क्षणार्धात शोककळा : शिरपुल्ली येथील घटना
यवतमाळ. मृत्यू कुणालाच चुकला नाही. तो कधी, कसा येईल, हेसुद्धा कुणी सांगू शकत नाही. सारेकाही सुखात सुरू असताना अचानक स्वकीयांचा मृत्यू ओढवतो आणि शोककळा पसरते, अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच दुर्दैवी घटना महागाव तालुक्यातील शिरपुल्ली (Shirpulli in Mahagao taluka ) येथे घडली. लग्नाच्या निमित्ताने सर्व वऱ्हाडी मंडळी मांडवात पोहोचली होती. त्यात वधुच्या आईची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इकडे लग्नविधी पार पाडले जात होते, तर तिकडे आईचा जीव वाचविण्यासाठी शर्थिचे उपचार सुरू होते. वधुच्या पाठवणीची लगबग सुरू असतानाच आईने अखेरचा श्वास घेतला (mother died on day of the daughter’s marriage). हे वृत्त येऊन धडकताच मांडवातील आनंदी वातावरणाची जाण शोककळेने घेतली. अवघे वऱ्हाडी आणि गावकरी या घटनेने हळहळले.
मंजूषा चौधरी (४०) असे आईचे नाव आहे. ऐन मिलीच्या लग्नाच्या दिवशीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. मंजूषा चौधरी यांची मोठी मुलगी पूजा हिचा विवाह सेलू येथील प्रेम ठाकरे याच्यासोबत निश्चित झाला होता. पुसद येथील मंगल कार्यालयात लग्नसोहळा नियोजित होता. दोन्ही कुटुंबीय अगदी आनंदात होते. त्याचवेळी वधूची आई मंजूषा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने पुसद येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
व्हीडिओ कॉलवर बघितले लग्न
लग्न मंडपात सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्नाचा विधी आटोपले जात होते. तिकडे रुग्णालयात नववधूच्या आईवर उपचार सुरु होते. आईला व्हीडिओ कॉलवरून लग्नाचा विधी दाखविला. सर्व विधी निर्विघ्न पारपडत असल्याने बघून आईच्या डोळ्यात अश्रृ तराळले, मुलीलाही अश्रृ आवरत नव्हते. पण, तिने कसाबसे स्वतःला रोखून ठेवले होते. ऐन पाठवणीच्या वेळी आईची प्राणज्योत मावलली. नववधू भावी जीवनाचे स्वप्न रंगवीत असतानाच आईच्या मृत्यूची वार्ता कळल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या आक्रोशाने साऱ्यांचेच डोळे पानावले.