प्रकट दिनाचा सोहळा सुरू असतानाच कारवाई
शेगाव. राज्यभरात गजानन महाराजांचा प्रकट दिन (Gajanan Maharaj Pragat din) उत्साहात साजरा केला जात आहे. गेले काही दिवस श्रींच्या मंदिरांमध्ये धार्मिक उपक्रम सुरू आहे. प्रकट दिनानिमित्त विदर्भाची पंढरी (Pandhari of Vidarbha ) मानल्या जाणाऱ्या शेगावातसुद्दा (Shegaon) लाखावर भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी रविवारी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. मंदिरात दर्शनाची लगबग सुरू असतानाच शेगावात पोलिसांनी कारवाई करीत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल आणि चार जीवंत काडतूस (pistol and four live cartridges ) जप्त करण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर शेगावात दाखल झालेल्या भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा अधिकच अलर्ट करण्यात आले आहे. हा घातपाताचा डाव तर नाही ना, अशी चर्चा भाविकांमध्ये सुरू आहे.
शेख अकबर शेख हरुन ( २१), जीवन तेजराव गाडे (१८) अशी दोघा आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन आहे. रविवारी रात्री शेगाव-वरवट मार्गावरील बुरुंगले विद्यालयाजवळ तैनात पोलिसांनी एक मोटारसायकल अडविली. वाहनचालकासह तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तूल, ४ जीवंत काडतुसे, ३ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल आणि दुचाकी जप्त केली असून आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात आरोपी हे मध्यप्रदेशच्या सिमेवरील संग्रामपूर तालुक्यातील पातूरडा, बुलडाणा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विक्रीसाठी आणली होती पिस्तूल
आरोपींनी हे पिस्तूल आणि काडतूस शेगावात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पूर्वीच मिळालेल्या गुप्त माहतीच्या आधारे ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्त यंत्रणांनी तूर्तास सुटकेचा श्वास टाकला असला तरी प्रकट दिनाचा मुहूर्त लक्षात घेता यंत्रणा जास्तच दक्ष झाल्या आहेत. गर्दीवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे. संशयीतांची विचारपूस केली जात आहे. कोणतीही अप्रिय घटनार नाही याची खातरजमा करण्यात आली आहे.