
तीन दिवसीय ‘रामस्मरण व्याख्यानमाला’ उत्साहात सुरू
नागपूर, 28 मार्च :
रामायणातील निषादराज गुह, केवट, माता शबरी आणि हनुमान यांच्या श्रीरामाशी झालेल्या गाठीभेटींच्या प्रसंगांचा दाखला देत सुप्रसिद्ध प्रवचनकार अमृतवक्ते विवेक घळसासी यांनी भक्तीचे चार मार्ग उलगडले. मैत्री, सेवा, समर्पण आणि धैर्य या चार मूल्यांमधून श्रीरामाशी जोडले जाण्याचा संदेश मिळतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने तसेच कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. सुनील देवउपाध्ये स्मृती तीन दिवसीय ‘रामस्मरण व्याख्यानमाला’ आज शनिवारी उत्साहात प्रारंभ झाली. महर्षी व्यास सभागृह, डॉ. हेडगेवार स्मारक परिसर, रेशीमबाग येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.न.पा. नागपूरचे सांस्कृतिक व क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर होते. यावेळी कलासंगमचे अध्यक्ष अमर आकरे, कोषाध्यक्ष रवी ढोके, केशवनगर सांस्कृतिक सभेचे सदस्य सुनील काशीकर, प्रकाश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध प्रवचनकार अमृतवक्ते विवेक घळसासी यांनी ‘रामायणातील भेटीगाठी’ या विषयावर गुंफले. श्रीरामांनी रामायणात केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर जीवनाचे सार दिले आहे. अस्तित्वाची परमोच्च अवस्था गाठण्यासाठी भक्ती हा सर्वात सुलभ आणि सुखद मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीरामाची आरती आणि भजन यापुरतेच रामचरित्र मर्यादित नाही; त्या श्रवणातून आणि चिंतनातून जीवनात गुणात्मक बदल घडणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
समाजातील उपेक्षित घटकांशी श्रीरामांच्या संवादांमध्ये मानवी मूल्यांचा गाभा दडलेला असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक गाठीभेटीतून समाजजागृतीचा संदेश अधोरेखित केला.
अध्यक्षीय भाषणात पियूष आंबुलकर म्हणाले की, आज युवकांचे जीवन अनेकदा दिशाहीन होत असून नवनवीन विकारांना ते सामोरे जात आहेत. अशा वेळी नव्या पिढीला प्रभू श्रीराम नव्याने समजावून सांगणारे आणि संस्कारक्षम असे कार्यक्रम समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
तत्पूर्वी सरस्वती शिशु मंदिराच्या बालकांनी रामस्मरण गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
……..
आज शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी, 29 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता, सुप्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांचे ‘भारत एक हिंदुराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे राहणार आहेत.















