Home Artical Blog मे महिना ‘सौर महिना’ म्हणून साजरा होणार

मे महिना ‘सौर महिना’ म्हणून साजरा होणार

0

महावितरणचा ‘पीएम सूर्यघर’ योजनेसाठी पुढाकार

नागपूर(Nagpur), दि. ५ मे २०२६: देशभरात मे २०२६ हा महिना ‘सौर महिना’ (मंथ ऑफ सोलर) म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ‘पीएम सूर्यघर: मोफत वीज योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली असून राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना यासंदर्भात विशेष सूचना जारी केल्या आहेत.

या मोहिमेचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त घरांवर सौर पॅनेल बसवून नागरिकांना मोफत विजेचा लाभ मिळवून देणे हा आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत निवासी ग्राहक, गृहनिर्माण सोसायट्या आणि निवासी कल्याणकारी संस्थांमध्ये जनजागृती करून नॅशनल पोर्टलवर नोंदणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. ज्या ग्राहकांनी आधीच अर्ज केले आहेत, त्यांच्याकडील सौर यंत्रणा बसवण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासकीय स्तरावर कामाला गती देण्यासाठी महावितरणने तपासणी प्रक्रिया (इन्स्पेक्शन) अधिक वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सौर यंत्रणा बसवल्यानंतर मिळणारे केंद्राचे अनुदान (CFA) ग्राहकांना वेळेत मिळणे सोपे होईल. तसेच, जास्तीत जास्त स्थानिक विक्रेत्यांना (व्हेंडर्स) नॅशनल पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे, जेणेकरून ग्राहकांना आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार विक्रेते निवडता येतील.

विशेष म्हणजे, मे महिन्यातील कामगिरीच्या आधारे केंद्र सरकारकडून राज्यांचा गौरव केला जाणार आहे. सर्वाधिक अर्ज मिळवणे, सर्वाधिक सौर संच कार्यान्वित करणे आणि वेळेत तपासणी पूर्ण करणे अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले जाईल. महावितरणच्या या पुढाकारामुळे राज्यात सौर ऊर्जेचा वापर वाढून पर्यावरण रक्षणासोबतच सर्वसामान्यांचे वीज बिल शून्यावर येण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या घरांवर सौर यंत्रणा बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.