कोराडी नव्या वीज प्रकल्पाचे वास्तव, समर्थन आणि होणारा विरोध!

0

 

नागपूर- कुठलेही नवे उद्योग, रोजगार निर्मिती म्हटली की त्यासाठी वीज ही लागणारच आणि विदर्भ ओळखला जातो तो या वीज निर्मितीसाठी. मुबलक पाणी,कोळसा आणि जागेची उपलब्धता यामुळे वीज निर्मिती प्रकल्पांना विदर्भातच प्राधान्य दिले जाते. मात्र, सध्या कोराडी वीज प्रकल्पातील 1320 मेगवाटच्या दोन नव्या संचांना पर्यावरणवाद्यांकडून काहीसा विरोध केला जात आहे. मविआच्या काळात स्थगिती देण्यात आलेला हा प्रकल्प आता शिंदे-फडणवीस सरकारसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. या संदर्भात जनसुनावणी नुकतीच झाली. यावेळी महादूला, कोराडी परिसरातील 13 ग्रामपंचायतीनी या प्रकल्पाचे समर्थन, स्वागत केले.

 

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना अशा अनेकांनी आधीच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, कर्करोगाला निमंत्रण मिळत असताना या नव्या प्रकल्पाची गरज का, इतर बंद पडलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी हे नवे प्रकल्प का दिले जात नाहीत, असा सवाल उपस्थित करीत या नियमबाह्य जनसुनावणीवरच आक्षेप घेतला मात्र पर्यावरण वाद्यांचा हा आक्षेप म्हणजे बाहेरच्या लोकांचा विरोध आहे. यात राजकारण केले जात आहे असा आरोप करीत भाजप समर्थित सर्वांनी या प्रकल्पाचे समर्थन केले.या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, सुपर क्रिटिकल प्रकल्प असल्यामुळे प्रदूषणाचा त्रास होणार नाही, प्रदूषण मुक्तीसाठी अद्ययावत यंत्रणा या ठिकाणी लावली जात आहे असे अनेक समर्थनाचे मुद्दे पुढे केले. याच प्रकल्पासंदर्भात वास्तव जाणून घेण्याचा समर्थक आणि विरोधकांची बाजू जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही ‘शंखनाद’ न्यूज चॅनलच्या वतीने केला. या प्रकल्पावर समर्थनाची बाजू मांडण्यासाठी आमच्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय,सामाजिक कार्यकर्ते, महादूला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेश रंगारी तर हा प्रकल्प कसा हानीकारक ठरणार आहे याविषयीची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड संदेश सिंगलकर. चला तर जाणून घेऊया कोराडी नव्या वीज प्रकल्पाचे वास्तव.