गर्भाशय पिशवीच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू
गोंदिया : डॉक्टरांना आपण नेहमी देवदुताची उपमा देतो. कोरोना काळातही अनेक डॉक्टरांनी उत्तम प्रकारची सेवा दिल्याचे तर काहींनी रुग्ण त्यांचे नातेवाईकांना लुबाडल्याचे आपण पाहिलंच. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णांचा जीव जाऊ शकतो हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. असाच काहीसा प्रकार गोंदिया जिल्ह्यात घडलेला आहे.गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर बांध येथील महिला शिल्पा हेमराज मेश्राम वय 41 वर्ष या महिलेला दिनांक 1 जून 2023 ला गर्भाशय पिशविच्या शस्त्रक्रिया करिता देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिल्पा मेश्राम यांनी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयातच आपल्या गर्भाशय पिशवीचे ऑपरेशन केले .मात्र दोन दिवसानंतर तिची प्रकृती खालावल्याने तेथील डॉक्टर यांनी याची माहिती डॉ.आनंद गजभिये यांना माहिती दिली .मात्र शिल्पा मेश्राम ची प्रकृती खालावत होती.
शिल्पा मेश्राम या महिलेच्या विविध चाचण्या करण्यात आल्या परंतु सदर महिलेचे पोट कशामुळे फुगत आहे या विषयी निदान न लागल्याने पुढील उपचारासाठी तिला गोंदिया येथे रेफर करण्यात आले . जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे भरती करता वेळेस डॉ.आनंद गजभिये हे त्या ठिकाणी उपस्थित होते . परंतु जिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने आणि महिलेची प्रकृती खालावत असल्याने तेथील डॉक्टरने शासकीय रुग्णालय नागपूर येथे रेफर केले. परंतु महिलेची खालावलेली स्थिती पाहता तिच्या परिवारातल्या लोकांनी तिला गोंदिया येथील खाजगी रुग्णालय सहयोग हॉस्पिटल या ठिकाणी भरती केले.परंतु घरची परिस्थिती दयनीय असल्यामुळे आपण तेवढे पैसे भरू शकणार नाही असे सांगितले डॉ.आनंद गजभिये यांनी जवळपास एक लाख रुपयांची मदत या कुटुंबाला केल्याचे कुटुंबाने सांगितले. परंतु त्या ठिकाणी सुद्धा महिलेची प्रकृती खालावत असल्याने त्यांनी नागपूरला नेण्यास सांगितले मात्र पुढील उपचारासाठी नागपूरला नेत असताना शिल्पा मेश्रामची प्राणज्योत मावळली.
डॉ. आनंद गजभिये यांनी शिल्पा मेश्राम हिच्या गर्भाशयाच्या पिशविची शस्त्रक्रिया बरोबर केलं नसल्यामुळेच शिल्पा मेश्रामचा मृत्यू झालेला आहे .तिच्या मृत्यूला डॉ.आनंद गजभिये हेच कारणीभूत आहेत असा ठपका परिवारातील आणि गावातील लोकांनी देवरी पोलिसात तक्रार करीत ठेवला आहे. या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करून या गरीब परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील आणि गावातील नागरिक करीत आहेत.