संसद भवनाच्या उद्घाटनाशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

0

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तुम्ही अशा याचिका का दाखल करता, हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला याचा विचार करायचा नाही. तुम्हाला तंड केला नाही, याबद्धल न्यायालयाचे आभार माना, या शब्दात न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नव्हे तर राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे व तसे आदेश लोकसभा सचिवालयास देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका वकील सीआर जया सुकीन यांनी केली होती. सुटीकालीन न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यासही नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.
अशा याचिकांकडे लक्ष देणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही, असे न्यायालयाने स्पष्टच सांगितले. या याचिकेचा फायदा कोणाला होणार? यावर याचिकाकर्त्याला नेमके उत्तर देता आले नाही. नव्या इमारतीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून लोकसभा सचिवालयाला निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.