
नांदेड : शोले चित्रपटात धर्मेंद्र अर्थात वीरुने बसंतीसाठी पाण्याच्या (Sholay style demonstration by husband) टाकीवर चढून घातलेल्या गोंधळाची आठवण करून देणारी घटना नांदेडमध्ये शुक्रवारी घडली. माहेरी गेलेली बायको नांदायला घरी येत नाही, या कारणापायी नवरोबाने उंच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केल्याचा प्रकार नांदेडच्या शोभानगर येथे घडला. देविदास बलदेवसिंग सिबिया (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा रेखा नावाच्या युवतीशी विवाह झाला असून त्यांना तीन मुलेही आहेत. बऱ्याच दिवसांपासून रेखा मुलांसह माहेरी राहते आहे. ती घरी परतत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास देविदासने बायको आणि मुलांना बोलावण्यासाठी नांदेडमधील शोभानगर येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. बायको व मुलांना बोलवा अन्यथा, टाकीवरून खाली उडी मारू असा इशारा तो देत होता. त्यापायी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. काहींनी या घटनेचे व्हिडिओ देखील काढून ते व्हायरल केले. दुसरीकडे पोलिस त्याची समजूत घालत होते. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लोक त्याला आश्वासने देत आहे. मागणी पूर्ण झाल्य़ाशिवाय उतरणार नाही, असे तो सांगत आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून या तरूणाला खाली आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.