त्यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले
उद्धव ठाकरे यांचा पुन्हा टोला

0

नागपूर. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तर आज एकनाथ शिंदे यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. सरसंघाचालक भागवत यांनी सावधानपणे कोणत्या कोपऱ्यात लिंबू, टाचण्या पडल्या आहेत का याचा शोध घ्यावा. कारण या मिंधे गटाची नजर बुभुक्षित आहे. यांनी वडील, नेते, पक्ष, कार्यालय चोरले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत लगावला.


सरकारवर टिका करताना ते म्हणाले की अधिवेशन सुरू झाल्यापासून अनेक घोटाळे बाहेर येत आहे. मात्र एकाही मंत्र्याचा राजीनामा होत नाही हे आश्चर्य आहे. आरोपींना क्लिनचिट तर आरोप करणार्यांना दोषी ठरविण्याचे षडयंत्र या सरकारने रचले आहे. विदर्भात हे अधिवेशन होत असताना विदर्भाला काय पॅकेज दिल्या जाते याकडे आमच्या नजरा लागल्या आहे. विदर्भातील उद्योजकांनी काम झाले असेल तर पाहुण्यांनी परत जावे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या भावनांचे समर्थन करताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “स्वत:मध्ये काही करण्याची धमक नाही याची कल्पना ज्याला असते तो असं चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचं ओरबाडण्याचं काम करतो. पक्ष चोरायचा, नेते चोरायचे हे असलं काम तेच लोक करतात. काल मिंधे गट मुंबई पालिकेत पक्ष कार्यालयावर दावा करायला गेला. आज मुख्यमंत्री RSS च्या कार्यालयात गेलेत मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावेत कारण जे भेट घ्यायला आले होते ते कुठं लिंबू-मिरच्या-टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.


अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. विदर्भातील शेतकर्यांना हे सरकार काय दिलासा देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. आमच्या कारकिर्दीत आम्ही विदर्भाला भरघोस मदत केली होती, असेही त्यांनी सांगितले. महापुरुषांचा अपमान करणार्या व्यक्तीने पदावर बसू नये, असे आम्हाला वाटते. पुरवणी मागण्यांमध्ये ५२ हजार कोटीची घोषणा केली आहे. परंतु यातील योजना कुठे आणि कशा राबविणार, तेवढ्या निधीची सांगड कशी घालणार, यावर खुलासा केला नसल्याचे ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा