ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमक्यांचा कॉल

0

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना (Sanjay Raut gets threat calls) यांनी धमकीचे फोन आल्याची माहिती पुढे आली असून बुधवारी दिवसभरात त्यांना धमकीचे दोन फोन आले. फोनवरून राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून जोरदार तणातणी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांना धमक्यांचे कॉल आल्याची माहिती आहे. संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवत हे सरकार नामर्दच असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी करताना शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या दारातील पायपुसणे असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली होती.


शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटले होते. यानंतर राऊतांनी आपले तोंड आवरावे, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर राऊत यांना धमक्यांचे फोन आल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. दरम्यान, या धमक्यांच्या कॉलनंतर ठाकरे गट काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागलेले आहे.यासंदर्भात पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.